काबूल । अफगाणिस्तानच्या कार्यवाहक संरक्षणमंत्र्यांना लक्ष्य करून केलेल्या बॉम्ब हल्ल्यात किमान आठ जण ठार तर 20 जण जखमी झाले. मात्र मंत्री पूर्णपणर सुरक्षित आहेत. तालिबानने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की,”अफगाणिस्तानची राजधानी काबुलजवळील हाय सिक्युरिटी असलेल्या भागात मंगळवारी हा स्फोट झाला. या स्फोटानंतर झालेल्या चकमकीत चार दहशतवादी ठार झाले.”
गृहमंत्रालयाचे प्रवक्ते मीरवाइज स्टेनकझई यांनी बुधवारी सांगितले की,” मृतांचा आकडा वाढूही शकतो.” तालिबानचे प्रवक्ते जबीहुल्ला मुजाहिद यांनी एका निवेदनात या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. हा हल्ला अशा वेळी झाला आहे जेव्हा तालिबान या दहशतवादी गटाने देशात आपले आक्रमण वाढवले आहे. ते देशाच्या दक्षिण आणि पश्चिम भागातील प्रांतीय राजधानींवर दबाव आणत आहेत.
मुजाहिद यांनी एका निवेदनात म्हटले आहे की,”अफगाण राष्ट्रीय सैन्याने विविध प्रांतांमध्ये केलेल्या अलीकडील हल्ल्यांचा बदला म्हणून हा हल्ला करण्यात आला.” स्टॅनेकझाई म्हणाले की,”या हल्ल्यात काळजीवाहू संरक्षण मंत्री बिस्मिल्ला खान मोहम्मदी यांच्या गेस्ट हाऊसला लक्ष्य केल्याचे दिसून आले.” मात्र मंत्री सुरक्षित असल्याचेही त्यांनी नमूद केले.
त्यांच्या पक्षाच्या जमीयत-ए-इस्लामीच्या एका नेत्याने माहिती दिली की,”घटनेच्या वेळी मंत्री घरी नव्हते आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. पाच तास चाललेल्या चकमकीत चार हल्लेखोर ठार झाल्याचे स्टानेकझाई म्हणाले. ते पुढे म्हणाले की,” हा स्फोट शेरपूर भागात झाला, जो राजधानीच्या सर्वात सुरक्षित क्षेत्रांपैकी एक आहे. अनेक वरिष्ठ सरकारी अधिकारी येथे राहतात.”
या घटनेच्या कित्येक तासांनंतर संरक्षण मंत्रालयाने एक व्हिडिओ जारी केला होता ज्यात मोहम्मदीने म्हटले की,”त्यांचे सुरक्षा कर्मचारी या आत्मघाती हल्ल्यात जखमी झाले आहेत.” काबूल पोलीस प्रमुखांच्या प्रवक्त्याने सांगितले की,”शेकडो लोकांना या भागातून बाहेर काढण्यात आले आहे. या घटनेनंतर सुरक्षा कर्मचाऱ्यांनी घरोघरी शोध घेतला.”
तालिबानच्या सत्ता हस्तगत करण्याच्या प्रयत्नांचा निषेध करताना संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने मंगळवारी अफगाणिस्तानातील नागरिकांवर हल्ले आणि दहशतवादाच्या घटनांचा तीव्र निषेध केला. सुरक्षा परिषदेने एका प्रेस निवेदनात म्हटले आहे की,”अफगाणिस्तान सरकार आणि तालिबानने राजकीय समाधान तसेच युद्धबंदीच्या दिशेने प्रगतीसाठी सर्वसमावेशक आणि अफगाणिस्तानच्या नेतृत्वाखालील शांतता प्रक्रियेत अर्थपूर्ण मार्गाने काम केले पाहिजे.”