काबूल । अफगाणिस्तानात तालिबानने ताबा मिळवल्यानंतर इतर दहशतवादी संघटनाही सक्रिय झाल्या आहेत. देशात अराजकतेचे वातावरण आहे. काबूलच्या हमीद करझई आंतरराष्ट्रीय विमानतळावर गुरुवारी झालेल्या आत्मघाती हल्ल्यात आतापर्यंत 105 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, अमेरिकेच्या सुरक्षा व्यवस्थेवर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. खरं तर, अफगाणिस्तानमधील राष्ट्रीय सुरक्षा संचालनालयाच्या (NSD) उच्च सूत्रांनी म्हटले आहे की,” एजन्सीने अमेरिकेला काबूल विमानतळावरील दुहेरी स्फोटांबाबत आधीच माहिती दिली होती. यानंतरही अमेरिकेला हे हल्ले रोखण्यात अपयश आले.”
सूत्राने एका न्यूज चॅनेलला सांगितले की,” अमेरिकेला आधीच माहिती देण्यात आली होती की, हक्कानी नेटवर्क हा स्फोट घडवून आणेल आणि त्याची जबाबदारी ISIS घेईल. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हक्कानी नेटवर्कने कथितपणे काबूल विमानतळावर स्फोट घडवून अराजक आणि गोंधळ संपवण्याचा एकमेव उपाय म्हणून हे स्फोट केले आहे.
ISIS- K (इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड द लेव्हंट-खुरासान प्रांत) ने या हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारली. हा गट तालिबानला आपला शत्रू मानतो. स्थानिक वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, काबूल स्फोटात आतापर्यंत 105 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर 1138 लोकं जखमी झाले आहेत. मृतांमध्ये अमेरिकन लष्कराचे 13 कमांडो आहेत.
या हल्ल्यानंतर अफगाणिस्तानचे स्वयंघोषित काळजीवाहू अध्यक्ष अमरुल्ला सालेह यांनी तालिबानचे खुरासान ग्रुपशी संबंध असल्याचा दावा केला आहे. मात्र, तालिबानने या हल्ल्यांसाठी अमेरिकेला जबाबदार धरले आहे.
पंजशीरमध्ये तालिबानला नॉर्दर्न अलायन्ससोबत आव्हान देणाऱ्या सालेहने स्फोटांनंतर ट्विट केले, “तालिबान्यांना त्यांच्या बॉसेसकडून चांगलाच धडा मिळाला आहे. तालिबानने ISIS शी असलेला आपला संबंध नाकारला आहे. जसे त्याने क्वेटा शूराची पाकिस्तानबरोबरील लिंक नाकारली. आमच्याकडे असलेले प्रत्येक पुरावे असे दर्शवतात की, ISIS च्याखुरासान ग्रुपची मुळे तालिबान आणि हक्कानी नेटवर्कमध्ये आहेत.
AFP च्या रिपोर्टनुसार, काही लोक उष्णतेपासून वाचण्यासाठी गुडघ्यापर्यंत खोल पाण्यात उभे होते. त्यानंतर एका हल्लेखोराने त्यांच्यावर हल्ला केला. त्यानंतर अवघ्या काही वेळातच मृतदेह पाण्यात विखुरले गेले. काही क्षणातच संपूर्ण दृश्य बदलले. ज्यांना विमानातून देश सोडण्याची अपेक्षा होती काही वेळानंतर त्यांना रुग्णवाहिकेत जाताना किंवा दूर नेताना पाहिले गेले. अनेक लोकं रक्ताने माखलेल्या नाल्यात आपल्या प्रियजनांचा शोध घेत होते आणि मदतीची याचना करत होते.
मिलाद नावाच्या एका प्रत्यक्षदर्शीने स्फोटानंतरचे दृश्य कथन केले आहे. मिलाद आपली पत्नी आणि तीन मुलांसह अमेरिकेत स्थायिक होण्यासाठी फ्लाइटची वाट पाहत होता. याच वेळी पहिला स्फोट झाला. सगळीकडे धुराचे लोट होते. मृतदेह विखुरलेले होते. त्याने सांगितले की,” मृतदेहाचे तुकडे नाल्यात पडले होते. सगळीकडे रक्तच रक्त होते.” मिलाद पुढे म्हणाला,”मी अमेरिकेत स्थायिक होण्यासाठी व्हिसासाठी अर्ज केला. परंतु स्फोटानंतरच्या गोंधळात डॉक्यूमेंट्स पडले. आता मला पुन्हा कधीही विमानतळावर जायचे नाही.”