पुणे : हॅलो महाराष्ट्र – पुणे शहरातील कोंढवा परिसरात एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. यामध्ये एका शालेय विद्यार्थ्यांनं आपल्या काही मित्रांना सोबत घेऊन वर्गातील मॉनिटरला बेदम मारहाण केली आहे. या प्रकरणी पीडित मुलाच्या वडिलांनी कोंढवा पोलीस ठाण्यात धाव घेऊन आरोपी मुलांविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणी दोन अल्पवयीन मुलांसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल करून पुढील तपासाला सुरुवात केली आहे.
काय आहे नेमके प्रकरण ?
संबंधित मारहाणीची घटना कोंढवा परिसरातील एका शाळेमध्ये घडली आहे. याठिकाणी वर्गाच्या मॉनिटरने काही विद्यार्थ्यांना हेअर कटिंग करून का आले नाहीत? अशी विचारणा केली होती. याचा राग आल्यामुळे काही विद्यार्थ्यांनी मॉनिटरला बेल्ट आणि लाकडी बांबूने मारहाण केली. या प्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात दोन अल्पवयीन मुलांसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ओवेज कैफ असे मुख्य आरोपीचे नाव असून बाकी आरोपी हे अल्पवयीन आहेत.
संबंधित मुलं ही कोंढव्यातील एका शाळेत आठवीच्या वर्गात शिकतात. तर 14 वर्षीय पीडित मुलगा वर्गाचा मॉनिटर आहे. घटनेच्या दिवशी मॉनिटरने वर्गातील दोन विद्यार्थ्यांना सर्वांसमोर तुम्ही कटिंग करून का आले नाहीत? अशी विचारणा केली. याचा राग मनात धरून आरोपी मुलांनी पीडित मॉनिटरला शिवीगाळ करून दमदाटी केली. यानंतर या आरोपींनी आपल्या अन्य काही मित्रांच्या मदतीने मॉनिटरला बेदम मारहाण केली. या मारहाणीत मॉनिटर गंभीर जखमी झाला. यानंतर पीडित मुलाच्या वडिलांनी कोंढवा पोलीस ठाण्यात आरोपी मुलांविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणी दोन अल्पवयीन मुलांसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल करून पुढील तपासाला सुरुवात केली आहे.