मुंबई । येत्या ३ मे रोजी देशातील लॉकडाउनचा दुसरा टप्प्याचा कालावधी पूर्ण होणार आहे. त्यासाठी फक्त ६ दिवस बाकी आहे. अशात पुन्हा एकदा एका प्रश्नाने डोकं वर काढलं आहे तो प्रश्न म्हणजे लॉकडाऊन संपणार कि वाढणार? याअनुषंगाने, देशातील मुख्यमंत्र्यांनी आपल्या राज्यातील परिस्थितीचे मुल्यमापन केले असून लॉकडाउनचा कालावधी वाढण्याबाबात विचार करत आहे. आज, सोमवारी देशातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी नरेंद्र मोदी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहे. यामध्ये लॉकडाउन वाढवण्याबाबत चर्चा होऊ शकतो. तसंच संपूर्ण परिस्थितीचा आढावादेखील घेणार आहेत.
दरम्यान, कोरोना व्हायरससाठी नेमलेल्या दिल्ली सरकारच्या विशेष समितीने राजधानीत १६ मेपर्यंत लॉकडाऊन सुरू ठेवण्याचा सल्ला दिला होता. दिल्लीतील केजरीवाल सरकारनेही लॉकडाउनचा कालावधी ३ मे नंतर पुढे आणखी वाढणार असल्याचे संकेत दिले आहेत. दिल्लीसह महाराष्ट्र, मध्य प्रदेश, प. बंगाल, पंजाब आणि ओडिसा राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनीही लॉकडाउन वाढवण्याची तयारी केली आहे. ज्या ठिकाणी करोनाग्रस्तांची संख्या आधिक (हॉटस्पॉट) आहे तिथे लॉकडाउन आधिक कडक करण्यात येणार असल्याचे संकेत दिले आहेत.
राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी लॉकडाऊन वाढवण्याचे संकेत दिले आहेत. राज्यातील ९२ टक्के करोना रुग्ण केवळ मुंबई-पुण्याचे आहे. कंटेन्मेंट झोनमध्ये १८ मेपर्यंत लॉकडाऊन सुरू राहावेत, अशी टोपे यांची मागणी आहे. परंतु, यावर पंतप्रधान मोदींशी चर्चेनंतर निर्णय घेण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. यापूर्वी तेलंगणाने लॉकडाउनचा कालावधी ७ मेपर्यंत वाढवण्याची घोषणा केली आहे.
गुजरात, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, हरियाणा, हिमाचल प्रदेश आणि कर्नाटक या ६ राज्यांनी मात्र आपण केंद्र सरकारच्या निर्देशाचे पालन करू असे स्पष्ट केले आहे. आसाम, केरळ आणि बिहार या संदर्भात सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींची राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांसोबत होणाऱ्या व्हिडिओ कॉन्फरन्सनंतर कोणत्याही निर्णयावर पोहचणार हे नक्की. मागील काही दिवसांमधील कोरोना व्हायरसच्या रूग्णांमध्ये होणारी वाढ पाहाता पंतप्रधान मोदी देशातील लॉकडाउन वाढवू शकतात. यापूर्वी अर्थव्यवस्थेला रूळावर आणण्यासाठी केंद्र सरकारनं २० आणि २५ एप्रिल रोजी काहीशा प्रमणात सशर्त सूट दिली होती. कोणत्या ठिकाणी दुकानं सुरू ठेवावी किंवा बंद याचा निर्णय राज्य सरकारांकडे सोपवण्यात आला होता.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”