नागपूरनंतर औरंगाबादेतील सफारी पार्क ठरणार मोठे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – मिटमिटा भागात महापालिकेतर्फे उभारल्या जाणाऱ्या सफारी पार्कचे काम प्रगतीवर असून, हे सफारी पार्क भव्यदिव्य करण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. सफारी पार्कसाठी सध्या १०० एकर जागा राज्य शासनाने दिली आहे. त्यात घरकुलासाठी राखीव असलेल्या १७ हेक्टरची भर पडणार आहे. तसेच वन विभागाकडून ४६ हेक्टर जागा मिळविण्यासाठी प्रशासनाने पाठपुरावा सुरू केला आहे. त्यात यश आले तर तब्बल ३०७ एकर जागेवरील हे सफारी पार्क नागपूरनंतरचे राज्यातील मोठे सफारी पार्क ठरणार आहे.

महापालिकेच्या सिद्धार्थ उद्यान प्राणिसंग्रहालयात प्राण्यांसाठी अपुरी जागा असल्याने मिटमिटा भागात सफारी पार्क विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला. स्मार्ट सिटी अभियानाअंतर्गत सुमारे पावणेदोनशे कोटी रुपये खर्च करून हे सफारी पार्क विकसित केले जात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हे सफारी पार्क आंतरराष्ट्रीयस्तरावर दखल घेतली जाईल, असे विकसित करण्याच्या सूचना महापालिकेला केल्या आहेत. त्यानुसार प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी सफारी पार्कसाठी वाढीव जागा मिळावी, यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

सर्वप्रथम महापालिकेला गट नंबर ३०७ मध्ये महापालिकेला १०० एकर जागा मिळाली. त्यानंतर याच गटनंबरमध्ये असलेली पण घरकुलासाठी राखीव असलेली व अन्य जागा महापालिकेने मागितली आहे. ही एकूण जागा ७७ हेक्टर म्हणजेच सुमारे दोनशे एकर होणार आहे. तसेच गट नंबर ५६ मधील आणखी ४६ हेक्टर जागेसाठी पाठपुरावा सुरू करण्यात आला आहे. ही जागा वनविभागाच्या ताब्यात आहे. त्यामुळे या जागेसाठी केंद्र शासनाकडे महापालिकेला पाठपुरावा करावा लागणार आहे. वाढीव जागेत कुठलेही बांधकाम होणार नसल्याने ही जागा महापालिकेला मिळू शकते. त्यामुळे सफारी पार्कचे एकूण क्षेत्रफळ ३०७ एकर होऊ शकते, असे उपायुक्त सौरभ जोशी यांनी सांगितले. राज्यातील ताडोबा अभयारण्याचे क्षेत्रफळ ५०८.८५ चौरस किलोमीटर आहे. पण विकसित केलेल्या सफारी पार्कचे नागपूर येथील गोरेवाडा सफारी पार्कचे क्षेत्रफळ सुमारे ५०० एकर एवढे आहे. महापालिकेला वन विभागाकडून ४६ हेक्टर जागा मिळाल्यास औरंगाबादचे सफारी पार्क नागपूरनंतरचे दुसरे मोठे सफारी पार्क ठरणार आहे.

Leave a Comment