लिंग परिवर्तनानंतर पोलीस कॉन्स्टेबलने केलं मुलीशी लग्न; म्हणाला आता सुखानं जीवन जगू शकेल..

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । वर्षभरापूर्वी लिंग परिवर्तन शस्त्रक्रिया करणार्‍या महाराष्ट्र पोलिसात कार्यरत पोलिस हवालदार ललित साळवे यांनी १६ फेब्रुवारी रोजी एका मुलीशी लग्न केलं. साळवे यांचा ललिता साळवे ते ललित साळवेपर्यंतचा प्रवास अनेक चढ-उतार आणि कायदेशीर लढायांनी भरलेला आहे. साळवे यांनी मे २०१८ मध्ये मुंबईतील शासकीय सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये सेक्स रीसाईनमेंट शत्रक्रियेचा पहिला टप्पा पार केला होता.

पुढील महिन्यांत दुसर्‍या व तिसर्‍या टप्प्यातील शत्रक्रियेनंतर बीड जिल्ह्यातील माजलगाव तहसील अंतर्गत येणाऱ्या राजेगाव गावातील रहिवाशी साळवे (३०) यांना अखेर नवीन ओळख व नाव प्राप्त झाले – ललित. शस्त्रक्रियेनंतर साळवे यांना महाराष्ट्र पोलिस दलात एका पुरुष कॉन्स्टेबलच्या नात्यानं फायदा मिळू लागला. रविवारी औरंगाबाद शहरातील एका छोटेखानी सोहळ्यात साळवे यांनी एका मुलीशी लग्न केलं.

माजलगाव येथे कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत असलेले साळवे म्हणाले की,”तीन-स्तरीय लिंग बदलाच्या शस्त्रक्रियेनंतर माझा पुनर्जन्म झाला आहे. लग्नानंतर मी नवीन जीवन सुरु केले आहे आणि आता मी आनंदाने जगू शकेन. माझे कुटुंबातील सदस्य आणि नातेवाईक माझ्या लग्नामुळं आनंदी आहेत.”

वर्ष २०१४ मध्ये ट्रान्ससेक्शुअल लिंगाची लक्षणे दिसल्यानंतर साळवेंना धक्का बसला होता, आणि त्यांच्या जनुकांमध्ये वाय गुणसूत्र असल्यानं ललिता पुरुषांऐवजी महिलांकडे आकर्षित होऊ लागल्या होत्या. बर्‍याच चाचण्यांनंतर, डॉक्टरांनी त्यांना कायमस्वरुपी उपाय म्हणून २०१६ मध्ये लिंग परिवर्तन शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला होता. पोलिस दलात रुजू झाल्यानंतर त्यांनी लिंग बदलाची शस्त्रक्रिया करण्यासाठी राज्य पोलिस विभागाशी संपर्क साधला होता.

मात्र, पोलीस विभागाने साळवे यांची याचिका फेटाळून लावली होती कारण पुरुष आणि महिला हवालदारांच्या पात्रतेचे निकष उंची आणि वजनासह भिन्न आहेत. कॉन्स्टेबलने लिंग परिवर्तन शस्त्रक्रिया करण्यासाठी एक महिन्यासाठी रजा मागितली होती, परंतु बीड पोलिस अधिकाऱ्यांनी त्यांची ही विनंती नाकारली होती. त्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. सेवेची बाब असल्याने उच्च न्यायालयाने साळवे यांना महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाकडे जाण्याचे निर्देश दिले होते. नंतर साळवे यांना लिंग परिवर्तनच्या शस्त्रक्रिया करण्यास गृह विभागाने रजा दिली होती.

 

ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.