कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
येडेमछिंद्र (ता.वाळवा) येथे क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यास अभिवादन करून व संविधानाची शपथ घेवून काॅंग्रेसच्या “संविधान बचाव” पदयात्रेला सुरूवात झाली. अखिल भारतीय काँग्रेस कमिटी व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सुचनेनुसार आज 3 डिसेंबर 2022 रोजी पदयात्रा सुरू करण्यात आली. सायंकाळी कराड येथे या यात्रेचा समारोप होणार आहे.
यावेळी काॅंग्रेसचे ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी, अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हाध्यक्ष झाकीर पठाण, संजय तडाके, जगन्नाथ कुंभार, नंदकुमार कुंभार, समीर जमादार, अजित कुमार ढोले, ताजुद्दीन खाटीक, रजिया शेख, प्राची ताकतोडे, मनीषा पाटील, सुषमा राजे घोरपडे यांच्यासह काॅंग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते. या पदयात्रेचे स्वागत कराड शहरात राज्याचे माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अध्यक्ष आ. नाना पटोले व आ. वाजहत मिर्झा यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. कराड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ सायंकाळी 4 वाजता पदयात्रा येणार आहे. तसेच सायंकाळी 5 वाजता शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे जाहीर सभा होणार असल्याची माहिती अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हाध्यक्ष झाकीर पठाण यांनी दिली.
येडेमछिंद्र ते कराड शहर अशी 25 किलोमीटर संविधान बचाव यात्रा असणार आहे. देशभरात संविधान पायदळी तुडवून हुकूमशाही कारभार होत आहे या घटनांच्या विरोधात निषेध व्यक्त करीत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या देशाला संविधान देऊन जी व्यवस्था उभारली त्या संविधानाचे रक्षण करणे आपले कर्तव्य आहे म्हणूनच “संविधान बचाव” रॅलीचे आयोजन संपूर्ण महाराष्ट्रात होणार आहे त्याची सुरुवात कराडमधून होत आहे.