औरंगाबाद – राज ठाकरे यांच्या दौऱ्यानंतर औरंगाबाद येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत मोठी उलथापालथ झाली आहे. जिल्हाध्यक्ष सुहास दाशरथे यांना पदावरून दूर केल्यानंतर इतर चार पदाधिकाऱ्यांची पक्षातून थेट हकालपट्टी करण्यात आली आहे. निलंबित चारही पदाधिकारी दाशरथे यांच्या गटाचे असल्याची माहिती आहे. यानंतर 53 स्थानिक पदाधिकाऱ्यांनी आज दुपारी पत्रकार परिषद घेऊन कुठलीही चुकी नसताना चार पदाधिकाऱ्यांचे निलंबन होणे अत्यंत वेदनादायी असून आम्ही पक्षाचा सामुहिक राजीनामा दिल्याचे जाहीर केले आहे.
औरंगाबाद मनसेत नवीन जिल्हाध्यक्षांची नियुक्ती होताच मोठी उलथापालथ दिसून येत आहे. गटबाजीवरून पक्षाने सुहास दाशरथे यांची जिल्हाध्यक्ष पदावरून उचलबांगडी केली. त्यानंतर त्यांच्या गटातील संदीप कुलकर्णी, चेतन शर्मा, रमेश पुरी आणि दीपक पवार यांच्यावर पक्षाची बदनामी केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. यातून चौघांचेही प्राथमिक सदस्यत्व रद्द केले असल्याचे पत्रक काढण्यात आले आहे. यामुळे स्थानिक स्तरावर तीव्र पडसाद उमटले आहेत. आज दुपारी सदस्यत्व रद्द करण्यात आलेल्या चार पदाधिकाऱ्यांच्या समर्थनार्थ 53 पदाधिकाऱ्यांनी सामुहिक राजीनामा दिला. जिल्हाध्यक्षांना पदावरून दूर करणे, चार पदाधिकाऱ्यांचे निलंबन आणि आता 53 पदाधिकाऱ्यांचे सामुहिक राजीनामे यामुळे मनसेत खळबळ माजली आहे. यावर पक्ष प्रमुख राज ठाकरे काय निर्णय घेतात याकडे आता मनसे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.
खोटे आरोप करून निलंबित केले –
सामुहिक राजीनामा देणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी संदीप कुलकर्णी, चेतन शर्मा, रमेश पुरी आणि दीपक पवार यांच्यावर झालेली निलंबनाची कारवाई चुकीची असल्याचे म्हटले आहे. मागील अनेक वर्षांपासून आम्ही पक्षाच्या चौकटीत राहून कामे केली, अंगावर केसेस घेतल्या मात्र, आम्हाला हुकुमशाही पद्धतीने पक्ष प्रमुख राज ठाकरे यांच्या पासून दूर ठेवले. कुठलीही चूक नसताना झालेल्या कारवाईमुळे आमच्या भावना दुखावल्या आहेत. हे अत्यंत वेदनादायी असल्याने आम्ही संपूर्ण विचार करून सामुहिक राजीनामा देत असल्याच्या भावना 53 पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत मांडल्या.