निवडणूक निकालांनंतर उद्धव ठाकरेंचे महायुतीत येण्यासाठी प्रयत्न सुरू; नितेश राणेंचा गौप्यस्फोट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपला तीन राज्यांमध्ये सत्ता मिळवण्यास यश मिळाले आहे. या यशानंतर आता महायुती देण्यासाठी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे भाजपच्या विविध नेत्यांकडे पायघड्या घालण्यास असल्याचा मोठा गौप्यस्फोट भाजप आमदार नितेश राणे यांनी केला आहे. नितेश राणेंनी केलेल्या या गौप्यस्फोटामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

नितेश राणे काय म्हणाले?

नितेश राणे यांनी म्हटले आहे की, “उद्धव ठाकरे भाजपच्या विविध नेत्यांकडे पायघड्या घालत आहेत. कुठल्याही परिस्थितीत मला तुमच्या युतीमध्ये घ्या, असे ते म्हणत आहेत. ही गोष्ट त्यांच्या अत्यंत जवळच्या माणसाने काल रात्री मला फोन करुन सांगितली आहे. त्यामुळे मी आता उद्धव ठाकरेंना आवाहन करतो की, त्यांनी दिल्लीतील खरगेंच्या बैठकीत इंडीया आघाडीच्या सर्व मित्रपक्षासंमोर आपल्या दोन्ही मुलांच्या डोक्यावर हात ठेवून सांगावं की, तुम्ही भाजपशी युती करण्याचा प्रयत्न केला नाही”

त्याचबरोबर, “एकीकडे भाजपवर टीका करायची, नावं ठेवायची आणि दुसरीकडे काँग्रेसचं गुणगाण गायचं. खरगेंच्या घरी जाऊन चहा, नाश्ता करायचा आणि आतमधून गुपचूप भाजपशी युती करण्यासाठी लोटांगण घालत असाल तर त्याचेदेखील स्पष्टीकरण इंडिया आघाडीच्या बैठकीत तुमच्या मित्रपक्षांना द्यावं,” असे आवाहन नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांना केले आहे.

दरम्यान, “काल चार राज्याचे निकाल लागल्यानंतर भारत देशात मोदींची गॅरंटी चालते यावर भारतातल्या नागरिकांनी पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केलं आहे आणि अपेक्षेप्रमाणे आमचे विरोधक शेंबड्या सारखे रडत आहेत” असा टोला देखील नितेश राणेंनी लगावला आहे.