हॅलो : महाराष्ट्र ऑनलाईन – सध्या देशात कोरोनाने थैमान घातले आहे. त्यातच आयपीएल २०२१ स्पर्धा खेळवली जात आहे. खेळाडूंना बायो बबलमध्ये कडक नियमांचे पालन करावे लागत आहे. काही खेळाडूंना आयपीएल सुरु होण्यापूर्वी कोरोनाची लागण झाली होती. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे काही खेळाडूंनी आयपीएलमधून माघार घेतली आहे. खेळाडूंनंतर आता पंच नितीन मेनन आणि पॉल रायफल यांनी आयपीएल स्पर्धेतून माघार घेतली आहे.
ऑस्ट्रेलिया सरकार भारतातून येण्याऱ्या प्रवाशांवर निर्बंध लावणार असल्याचे समजल्यावर ऑस्ट्रेलियाचे पॉल रायफल चिंतेत होते. त्यानंतर त्यांनी अखेर मायदेशी जाण्याचा निर्णय घेतला. तर दुसरे पंच नितीन मेनन यांच्या आई आणि पत्नीला कोरोनाची लागण झाली आहे. ‘नितीन मेनन यांना एक लहान मुलगा आहे. त्यात त्यांची आई आणि पत्नी करोनाबाधित झाले आहेत. तर रायफल फ्लाइटवर लादलेल्या बंधनामुळे चिंतेत होते. अखेर त्या दोघांनी आयपीएलमधून माघार घेण्याचा निर्णय घेतला. या दोघांच्या जागेवर आता दुसरे पंच मैदानात उतरतील’, असे एका अधिकाऱ्याने स्पष्ट केले आहे.
मागच्या आठवड्यात ऑस्ट्रेलियाचा अॅडम झम्पा, केन रिचर्डसन आणि अँड्र्यू टाय हे मायदेशी परतले होते. तसेच घरच्यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे आर. अश्विनने स्पर्धेतून माघार घेतली आहे.