हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना चांगल्या सुविधा मिळाव्या आणि त्यांचा लांब पल्ल्याचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी केंद्रातील मोदी सरकारने देशातील वेगेवेगळ्या राज्यात वंदे भारत एक्सप्रेस सुरु केल्यात. वंदे भारत ट्रेनला प्रवाशांचा चांगला प्रतिसादही मिळत आहे. काही दिवसांपूर्वी ओडिसा राज्यात वंदे भारत एक्सप्रेस सुरु करण्यात आल्यानंतर केंद्र आता सरकार वंदे भारत सारखीच वंदे मेट्रो सुरु करण्याच्या तयारीत आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी वंदे मेट्रोच्या नव्या मार्गाची माहिती दिली आहे.
दोन राज्यातील अंतर कमी करण्यासाठी सध्या भारतात 17 मार्गिकेवर धावणारी वंदे भारत ट्रेन दळण वळणाचे उत्तम साधन आहे. पण दोन शहरातील अंतर कमी करण्यासाठी भारत सरकार वंदे भारत ट्रेनच्या धर्तीवर वंदे मेट्रो हि संकल्पना राबवणार आहे . याबाबत माहिती देताना अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, वंदे भारत ट्रेनची भेट मिळाल्यानंतर ओडिसाला आणखी एका नवीन ट्रेनची भेट मिळू शकते. ओडिसात पुरी-भुवनेश्वर-कटक दरम्यान भारतीय रेल्वे वंदे मेट्रो सुरू करू शकते. ही विशेष ट्रेन जानेवारी-फेब्रुवारी 2024 दरम्यान सुरू केली जाऊ शकते.
वंदे मेट्रो म्हणजे काय?
वंदे मेट्रो ही वंदे भारत ट्रेनची एक लहान आवृत्ती असेल जी कमी अंतर असलेल्या दोन शहरांदरम्यान धावेल . भारत सरकारने 2023-24 च्या अर्थसंकल्पात या ट्रेनची घोषणा केली होती. या ट्रेनद्वारे 100 किमीपेक्षा कमी अंतर असलेली दोन शहरे जोडली जातील. मोठी लोकसंख्या असलेल्या मोठ्या शहरांमध्ये वंदे मेट्रो 50 ते 60 किलोमीटर दरम्यान चालवली जाईल अशी रेल्वेची योजना आहे.