सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे
एसटीचे राज्य शासनामध्ये विलीनीकरण करा या मागणीसाठी कर्मचाऱ्यांचे गेल्या सहा महिन्यांपासून मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन सुरू होते. न्यायालयाच्या निकालानंतर आंदोलक कर्मचाऱ्यांनी आनंद व्यक्त केला. मात्र, दुसऱ्या दिवशी शरद पवार यांच्या निवास स्थानावर आंदोलकांनी चप्पल आणि दगड भिरकावले.
याबाबत बोलताना आमदार गोपीचंद पडळकर यांनी हे आंदोलन भारकटल्याची टीका केली आहे. यावेळी बोलताना पडळकर म्हणाले,” एसटीचे राज्य शासनात विलीनीकरण करा या मागणीसाठी सदाभाऊ खोत आणि मी स्वतः सहभागी झालो होतो. एस टी कामगारांच्या आंदोलनातून बाहेर पडलो. आम्ही होतो तेंव्हा बैठकीत जे झाले तेच पुढे झाले. त्या पलीकडे सरकार कडून काही निर्णय झाले नव्हते.”
“आम्ही न्यायालयीन लढा लढूया असंही कर्मचाऱ्यांना सांगितलं होतं. मात्र, कर्मचाऱ्यांच्या भावना तीव्र होत्या. आम्ही आंदोलनातून बाहेर पडल्या नंतर देखील सरकार आणि कर्मचारी यांच्यात कोणताही मेळ झाला नाही.” सरतेशेवटी हे आंदोलन भरकटलेल्या दिशेने गेले असल्याचे मत त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले.