औरंगाबाद – एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करण्यात यावे यासह इतर मागण्यांसाठी राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांनी ऐन दिवाळीत संप पुकारल्याने दिवाळीनंतर आपापल्या गावी परतणाऱ्या प्रवाशांचे मोठ्या प्रमाणावर हाल झाले. या प्रवाशांना या संपाचा मोठ्या प्रमाणावर फटका बसला आहे. रविवारपासून कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला आहे. आज या संपाचा तिसरा दिवस आहे. तिसऱ्या दिवशी कर्मचाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.
औरंगाबाद विभागातील औरंगाबाद सिडको व मध्यवर्ती आगारात आपल्या मागण्यांना घेऊन कर्मचारी आक्रमक झाले आहेत. आज संपाच्या तिसऱ्या दिवशी शहरातील सिडको आगारात एसटी कर्मचाऱ्यांनी सामूहिक मुंडन आंदोलन करण्यास सुरुवात केली आहे. तोच दुसरीकडे शहरातील मध्यवर्ती बस स्थानकात कर्मचाऱ्यांनी अर्धनग्न होत झोपलेल्या सरकारला जागे करण्यासाठी सामूहिक गोंधळ आंदोलन करत आहेत. आता जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत माघार घेणार नाही असा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला आहे.
शहरबस सेवा देखील ठप्प –
एसटी कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी पुकारलेल्या संपामुळे औरंगाबाद स्मार्ट शहरबस सेवा देखील ठप्प झाली आहे. यामुळे शाहर्ब्स सेवेला मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. तसेच सर्वसामान्य प्रवाशांच्या खिशाला देखील नाहक भुर्दंड बसत आहे. रिक्षाचालक तसेच खासगी वाहन चालक संधीचा फायदा घेत अव्वा च्या सव्वा भाडे आकारात आहेत.