सोलापूर प्रतिनिधी । तब्बल एक महिन्याच्या चाललेल्या सत्तानाट्याला अखेर २८ नोव्हेंबर ला पूर्णविराम मिळाला. ‘महाविकासाआघाडी’ने एकत्र येत राज्यामध्ये सत्ता स्थापन केली. मात्र याच्या काही दिवस आधी सत्ता संघर्षामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीच्या अजित पवार यांच्यासोबत सत्ता स्थापन करत सर्वांना जोरदार धक्का दिला. मात्र सत्ता स्थापनेचा दावा न करू शकल्याने अल्पकाळात त्यांचे सरकार कोसळले. मात्र सत्तास्थापनेच्या या नाट्यमय घडामोडीनंतर पहिल्यांदाच राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली. निम्मित होत माढ्यामधील शाही विवाह सोहळा. या विवाह सोहळ्यात हे दोघेही नेते एकत्र बसून चर्चा करतानाचा व्हिडीओही समोर आला आहे.
दरम्यान सोलापुरातील करमाळ्याचे आमदार संजय शिंदे यांचा मुलगा यशवंत शिंदे यांचा शाही विवाह आयोजित करण्यात आला होता. जिंदाल कंपनीच्या शेजारी, एमआयडीसी टेंभूर्णी या ठिकाणी हा शाही विवाहसोहळा पार पडला. या विवाहसोहळ्याला अनेक राजकीय नेत्यांनी हजेरी लावली. मात्र सर्वांच्या नजरा दोघांवरच होत्या. विशेष म्हणजे मंगलाष्टके सुरु असताना अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांमध्ये चांगल्याच गप्पा रंगल्या होत्या. मंगलाष्टके संपल्यानंतर ते दोघांनीही उभे राहून वधू-वराला आशिर्वाद दिला. सध्या त्यांचा हा एकत्रित व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.