पुणे प्रतिनिधी । सोलापूरमधील करमाळ्यात अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस एका लग्न सोहळ्यात एकमेकांच्या शेजारी बसले होते. राज्यातील सत्तापेच सुटल्यानंतर या दोघांना पहिल्यांदा एकत्र पाहिलं गेलं. संजयमामा शिंदे यांच्या मुलाच्या लग्न सोहळ्यात ह्या दोघांनी हजेरी लावली असता यावेळी दोघांनी बराच वेळ गप्पाही मारल्या. हा संपूर्ण प्रकार कैमरात कैद होऊन त्याला व्हायरल वळण लागलं. त्यांच्या या चर्चेचा विडिओ माध्यमात प्रसारित झाल्यावर या दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली असेल याबाबत तर्क-वितर्क लढवले जात होते. पण अखेर अजित पवार यांनीच सर्व उलट-सुलट चर्चांना विराम देत त्यांच्यात नेमकं काय बोलणं झालं याचा आज बारामतीत माध्यम प्रतिनिधींसमोर खुलासा केला.
काय म्हणाले अजित पवार?
संजयमामा शिंदे यांच्या मुलाच्या लग्नात फडणवीस आणि माझी खुर्ची शेजारीच लावली असल्याने आम्ही एकत्र बसलो होते.यावेळी मी त्यांना हवा पाण्याबद्दल विचारत चौकशी केली”. यावेळी मंत्रिमंडळ विस्तारात तुम्ही उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार का? असा सवाल करण्यात आला होता. याबाबतही अजित पवार यांनी यावेळी सूचक विधान केलं. ‘मला उपमुख्यमंत्री करावं अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे. पण ते ठरवण्याचा निर्णय हा त्या त्या पक्षप्रमुखांचा आहे असं ते म्हणाले. तसेच मंत्रिमंडळात खाते वाटपाचा निर्णय हा मुख्यमंत्र्यांचा आहे. त्याबद्दल मला विचारू नका’ असंही अजित पवार यावेळी म्हणाले. तसेच त्यांनी सिंचन घोटाळ्यासंबंधी बोलायला नकार दिला.