हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात परतीच्या पावसाने, अतिवृष्टीने अतोनात नुकसान झाले असून, बळीराजा पुरता हवालदिल झाला आहे. या शेतकर्याला दिलासा देण्यासाठी आणि झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सकाळी बारामती आणि नंतर पंढरपूर येथे जाऊन अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित झालेल्या नुकसानग्रस्त भागांची पाहणी केली. यावेळी त्यांनी स्थानिकांशी संवाद साधला. या पुरामुळे बाधित झालेल्या रस्ते-पुलांच्या दुरुस्तीची कामे तातडीने करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देत, शेती पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
यावेळी अजित पवार म्हणाले की, “मी नुकसानग्रस्त भागातील अनेक लोकांशी बोललो, तिथले वयस्कर लोक म्हणाले की, इतका पाऊस आम्ही आयुष्यात कधीच पाहिला नव्हता. त्यावरुन आपण नुकसानाची कल्पना करु शकतो. या पावसामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालं आहे. पिकाचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. आम्ही संबंधित विभागाला पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार पंचनामे सुरु झाले आहेत. काही दिवसात पंचनामे पूर्ण होतील. त्यानुसार शेतकऱ्यांना, नुकसानग्रस्तांना मदत करण्यात येईल”.
राज्यातील परिस्थितीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोलले आहेत. त्यांनी मदतीचं आश्वासन दिलं आहे. राज्याला सध्या निधीची गरज आहे. आम्ही नुकसानाची पाहणी करुन केंद्राकडे मदत मागणार आहोत. केंद्र सरकारने राज्यातील परिस्थितीची माहिती घेण्यासाठी त्यांचं पथक तातडीने राज्यात पाठवावं, असं सांगणार आहोत”.असंही अजित पवार म्हणाले.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’