कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
कोयनानगर येथे नव्याने बांधण्यात आलेल्या कोयनाप्रकल्प शासकीय विश्रागृहाचे (चेंबरी) केलेले कामकाजावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर भाषणात नाराजी व्यक्त केली. चेंबरीचा अधिकाऱ्यांनी चेचाच करून टाकला आहे. कुठे फेडाल ही पापं वरं गेल्यावर तुम्हांला नरकातच जावं लागेल. त्यामुळे त्यांची चाैकशी लावणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. अजित पवार यांनी स्वतः उद्घाटन केलेल्या कामांच्या चाैकशीचे आदेश देणार असल्याचे काही मिनिटांतच जाहीर सभेत सांगितले.
कोयना धरणग्रस्तांना जमीन वाटपाचा अनुशंगाने घेतलेल्या कार्यक्रमावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते कोयना धरणालगत नव्याने बांधण्यात आलेल्या चेंबरी शासकीय विश्रामगृहाचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाला पालकमंत्री बाळासाहेब पाटील, गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई, खासदार श्रीनिवास पाटील, माजी आमदार विक्रमसिंह पाटणकर, मदत व पूर्नवसन विभागाचे प्रधान सचिव असिम गुप्ता, विभागीय आयुक्त सौरभ राव, प्रभारी जिल्हाधिकारी माधवी सरदेशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहीया, पोलीस अधीक्षक अजयकुमार बंसल, जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता ह. वि. गुणाले, सातारा सिंचन मंडळाचे अधीक्षक अभियंता संजय डोईफोडे, श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर, सत्यजित पाटणकर आदी उपस्थित होते.
अजित पवार म्हणाले, सगळ्या अधिकाऱ्यांना मी सांगू इच्छितो बाबांनो आम्ही तुम्हांला दीड लाख कोटी रूपये पगार, पेन्शन देतो, तो पैसा राज्यातील जनतेचा टॅक्सचा पैसा असतो. तेव्हा कामे तरी चांगली करा. कुठे फेडाल ही पाप, वर गेल्यावर तुम्हांला नरकातच जावं लागेल. येथे मी 1999 ते 2004 पालकमंत्री म्हणून काम केले आहे. जो अधिकारी काम करतो त्याच्या पाठीशी मी उभा राहतो, त्याला अडचण येवू देत नाही. पण काम का चांगल करत नाही. कोण डोईफोडे का कोण त्यांना कळेना की वळेना, हे बरोबर नाही. पुढचं काम तरी चांगलं करावे, हे सर्व अधिकाऱ्यांना सांगतो. लोकांनी म्हटलं पाहिजे सरकारच्या काळात चांगलं काम केले. अनेक अधिकाऱ्यांना वाटतं मी सारखा दमचं देतो, तेव्हा चांगलं काम करा. मी निश्चित काैतुक करेन.