हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन|राज्याचे उपमुख्यमंत्री झाल्यानंतर प्रथमच सातारा जिल्ह्यात आलेल्या अजितदादा पवारांचे शिरवळपासून कराडपर्यंत जल्लोषात स्वागत करण्यात आले. प्रीतिसंगमावर देखील समर्थक जमले होते. मात्र, गर्दीत उत्साह दिसला नाही. दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळावर अभिवादन केल्यानंतर अजितदादांनी भाषण टाळले आणि ते निघून गेले. एकंदरीतच कराडमध्ये अजितदादांचा ‘फ्लॉप शो’ झाला.
राष्ट्रवादीतील फुटीनंतर उपमुख्यमंत्री होऊन अजित पवार पहिल्यांदाच सातारा जिल्ह्यात येत असल्याने त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली होती. स्वागताचे बॅनर झळकले होते. त्यामुळे या दौऱ्याची मोठी उत्सुकता होती. मात्र, अजितदादांच्या दौऱ्यात म्हणावी तेवढी गर्दी दिसली नाही. शिवाय गर्दीमध्ये उत्साह देखील दिसून आला नाही. किरकोळ घोषणाबाजी झाली आणि पत्रकारांशी संवाद साधून अजितदादा थेट इस्लामपूरकडे रवाना झाले.
अजितदादा कराड येथील दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी अभिवादन केल्यानंतर येथील बाहेरील पारालगत उभारण्यात आलेल्या स्टेजवरून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार होते. त्यासाठी या ठिकाणी एक स्टेज देखील उभारण्यात आले होते. मात्र, कार्यकर्त्याची कमी संख्या पाहता उपमुख्यमंत्री पवारांनी आपला कार्यक्रम बदलला. दिवंगत चव्हान साहेबांच्या समाधिस अभिवादन केल्यानंतर ते थेट गाडीतच जाऊन बसले.
अजितदादांनी ‘त्या’ स्टेजवर जाणे टाळले
अजितदादांचा गट भाजपबरोबर गेल्यानंतर दुसऱ्याच दिवशी शरद पवार प्रीतिसंगमावर आले होते. त्यांच्या समर्थनार्थ मोठ्या संख्येने कार्यकर्ते प्रीतिसंगमावर आले होते. त्यावेळी शरद पवारांनी पारावर उभे राहून भाषण केले होते. अजितदादाही भाषण करतील, या अपेक्षेने कार्यकर्त्यांनी छोटे स्टेज घातले होते. मात्र, सुमार गर्दीमध्ये अजितदादांनी भाषण टाळून काढता पाय घेतला.
आमदार, खासदार समर्थकांनी फिरवली पाठ…
अजितदादांच्या स्वागतासाठी लावलेल्या बॅनर्सवरील फोटो पाहता छुपे रूस्तम आज त्यांच्या स्वागतासाठी हजर राहतील, अशी चर्चा होती. मात्र, राजेश पाटील-वाठारकर, आनंदराव पाटील ऊर्फ राजाभाऊ उंडाळकर यांच्या व्यतिरिक्त खासदार श्रीनिवास पाटील आणि आमदार बाळासाहेब पाटील यांच्या समर्थकांनी अजितदादांच्या दौऱ्यात सहभागी होणे टाळले.