सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे
स्वर्गीय आर आर पाटील यांनी राज्यातील सर्व गोरगरिबांच्या हितासाठी आपले आयुष्य वेचले. राज्याला दिशा देणाऱ्या त्यांच्या सांगलीतल्या स्मारकासाठी ८ कोटी ७० लाख रुपयांचा निधी देणार आहे. येत्या अर्थसंकल्पात त्याची तरतूद करण्यात आली आहे. तसेच अंजनी येथील निर्मळ स्थळाचा विकास एका वर्षात पूर्ण करणार असल्याचा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला. अंजनी येथे पाचव्या पुण्यतिथी कार्यक्रमात ते बोलत होते.
माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा समाचार घेताना ते म्हणाले मुनगंटीवार यांनी आता काँग्रेस-राष्ट्रवादी कधीच सत्तेत येणार नाही असे वक्तव्य केलं होतं, पण कोणी ताम्रपट घेऊन येत नाही ,मीही आलो नाही पण आम्ही परत आलोय हे लक्षात ठेवा. महिला अत्याचारांबाबत बोलताना पवार म्हणाले की महिलांवर अत्याचार करणाऱ्या प्रवृत्तीचा तात्काळ बंदोबस्त झालाच पाहिजे. अशा घटना खेदजनक असून येत्या अधिवेशनात यासंबंधी कडक कायदा करणार आहे. जेणेकरून गुन्हेगारांमध्ये याची भीती निर्माण होईल.
यावेळी सर्वांनी एक होऊन राजकारण बाजूला ठेवून यावर चर्चा करावी असे ते म्हणाले. यावेळी जलसंपदामंत्री जयंत पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील उपस्थित होते.