नार्वेकरांनी मुख्यमंत्र्यांचे नाव असलेल्या खुर्चीवर अजितदादांना बसवलं; चर्चांना उधाण

ajit pawar on cm chair
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन  | आज नरिमन पॉइंट परिसरातील मनोरा आमदार निवासाचा भूमिपूजन कार्यक्रम पार पडला आहे. या कार्यक्रमासाठी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासोबत राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित होते. काही कारणास्तव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहता आले नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर राहूल नार्वेकर यांनी अजित पवार (Ajit Pawar)  यांना बसण्यासाठी सांगितले. तसेच खुर्चीवर लावलेला मुख्यमंत्री नावाचा स्टिकरही काढून टाकला. परंतु याच गोष्टीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या खुर्चीवर बसण्याचा मान उपमुख्यमंत्री अजित पवार यांना राहुल नार्वेकर यांनी दिल्यामुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. भूमिपूजनाच्या कार्यक्रमासाठी राहुल नार्वेकर आणि देवेंद्र फडणवीस जवळ बसले होते. तर नार्वेकर यांच्याजवळ असलेली मुख्यमंत्र्यांची खुर्ची रिकामीच होती. त्यामुळे अजित पवार दुसऱ्या खूर्चीवर बसले असताना देखील नार्वेकर यांनी मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसण्यासाठी अजित पवार यांना सांगितले. तसेच त्यांनी खुर्चीला लावलेला मुख्यमंत्री असे लिहिलेला स्टीकरही काढून टाकला. त्यानंतर अजित पवार मुख्यमंत्री खूर्चीवर बसले.

राहुल नार्वेकर यांनी केलेल्या या कृतीमुळे आता राजकीय वर्तुळात वेगवेगळे तर्क वितर्क लावण्यास सुरुवात झाली आहे. सध्या राज्यात अगोदरपासूनच अजित पवार यांच्या मुख्यमंत्रीपदासंदर्भात चर्चा सुरू आहेत. तर अजित पवार लवकरच मुख्यमंत्रीपदावर दिसतील असे संकेत पवार गटातील आमदारांकडून देण्यात येत आहेत. मुख्य म्हणजे, अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्त ‘भावी मुख्यमंत्री’ असे बॅनर लावल्यामुळे तर या चर्चांना आणखीन उधाण आले आहे. अशातच आता राहूल नार्वेकर यांनी केलेले कृत्य या चर्चांमध्ये आणखीन भर टाकणारे आहे.

दरम्यान, आज गेल्या 4 वर्षांपासून रखडलेल्या मनोरा आमदार निवासाचे आज भूमिपूजन झाले आहे. पुढच्या तीन वर्षात या आमदार निवासाचे बांधकाम पूर्ण करण्याचा मानस राज्य सरकारचा आहे. गेल्या चार वर्षांपासून रखडलेल्या आमदार निवासाचा खर्च तब्बल 400 कोटींनी वाढला आहे. या आमदार निवासात विधानसभेच्या २८८ तर विधान परिषदेच्या ७८ अशा एकूण ३६८ आमदारांची व्यवस्था करण्यात येणार आहे.

आमदार निवासाच्या भव्य इमारतीत आमदारासाठी एक हजार चौरस फूट क्षेत्रफळाची  सदनिका पुरविली जाणार आहे. या इमारतीचे बांधकाम लार्सन अँड टुब्रो ही बांधकाम कंपनी करणार आहे. आमदार निवासाचा १३ हजार ४२९ चौरस मीटर क्षेत्रफळाचा भूखंड आहे. आमदार निवासात राहणाऱ्या आमदारांसाठी सर्व सोय पुरवली जाणार आहे. सभागृह, अतिथीगृह, ग्रंथालय, पुस्तकाचे दुकान, क्लब हाऊस, मिनी थिएटर अशा सर्व गोष्टी आमदारांसाठी उपलब्ध करून देण्यात येतील.