हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लाडकी बहीण योजनेचे पैसे परत घेण्याची भाषा करणाऱ्यांची जीभ हासडून काढू असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी नाव न घेता आमदार रवी राणा यांच्यावर निशाणा साधला आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीची जन सन्मान यात्रा पिंपरी चिंचवड परिसरात आली होती. यावेळी आपल्या भाषणात त्यांनी लाडकी बहीण योजनेबाबत रवी राणा (Ravi Rana) यांनी केलेल्या वक्तव्याचा समाचार घेतला तसेच लोकसभेला आरक्षण आणि संविधान बदलणार असा खोटं पण रेटून बोल असा प्रचार केला. पण, मी संविधानाला हात लावू देणार नाही अशी ग्वाहीही अजित पवारांनी दिली. यावेळी व्यासपीठावर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, युवा नेते पार्थ पवार, आमदार अण्णा बनसोडे, माजी आमदार विलास लांडे, महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर, माजी महापौर मंगला कदम, योगेश बहल, सुरज चव्हाण, ज्येष्ठ नेते भाऊसाहेब भोईर, नाना काटे, महिला कविता आल्हाट आदी उपस्थित होते.
अजित पवार म्हणाले, रक्षाबंधनाच्या निमित्ताने जेव्हा बहीण भावाला राखी बांधते. यावेळी भाव आपल्या बहिणीला कोणीतरी अशी भेट नक्कीच देते. या भेटवस्तूवर बहिणीचा अधिकार असेल तर ती भेट कधीही परत घेता येणार नाही. आमच्या सरकारने या योजनेअंतर्गत सर्व भगिनींना ही भेट दिली आहे. कोणत्याही मायच्या लालने याबाबत चुकीचे वक्तव्य केले तर मी त्याची जीभ हासडीन असा सज्जड दम अजित पवारांनी दिला. आजपर्यंत ९० लाख महिलांना ३ हजार रूपये पाठवले आहेत. मी तुमचा भाऊ आहे. त्यामुळे सावत्र भावापासून लांब रहा. उद्यापर्यंत १ कोटी २५ लाख महिलांना मदत मिळणार आहे. हे सरकार असेपर्यंत ६-७ हजार रूपये महिलांना मिळतील असं अजित पवार म्हणाले.
रवी राणा यांचे विधान काय होते?
ज्याचं खाल्लं त्याचं जागलं पाहिजे. सरकार देत राहते, पण सरकारला आशीर्वादही दिला पाहिजे. आमचं सरकार आल्यावर लाडकी बहिण योजनेचे 1500 रुपयांचे आम्ही 3 हजार रुपये करू, तर आता त्यासाठी मला तुमचा आशीर्वाद हवा आहे. मात्र, ज्यांनी मला आशीर्वाद दिला नाही तर मी तुमचा भाऊ म्हणून ते 1500 रुपये तुमच्या खात्यातून वापस घेणार, असं रवी राणा यांनी म्हंटल. रवी राणा यांच्या या विधानाने महायुती सरकारची गोची होण्याची शक्यता आहे.