हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| देशभरात लोकसभा निवडणुकीची (Loksabha Election) धामधूम सुरू आहे. यात बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये विजयाचा गुलाल कोण उधळणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. परंतु निकाल लागण्यापूर्वीच राजकीय वर्तुळात घडामोडींचा वेग वाढला आहे. शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांना (Rohit Pawar) धक्का देणारी एक मोठी बातमी समोर आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar) पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज अक्षय शिंदे (Akshay Shinde) यांच्यावर राष्ट्रवादी युवक काँग्रेस उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे.
सध्या बारामती मतदारसंघात पवार विरुद्ध पवार अशी लढत पाहायला मिळत आहे. कारण, राष्ट्रवादी पक्ष फुटल्यानंतर अजित पवार गटाच्या बाजूने बारामती मतदारसंघात सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) उभ्या राहिल्या आहेत. तर शरद पवार गटाच्या बाजूने खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांना बारामतीतून तिकीट देण्यात आले आहे. त्यामुळे बारामतीतील मतदारांचे मन जिंकण्यासाठी दोन्ही पक्षांकडून वेगवेगळ्या पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून येत्या रविवारी सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ बारामतीत जाहीर सभा होणार आहे.
महत्वाचे म्हणजे, या सर्व घडामोडी घडत असतानाच अजित पवार यांनी अक्षय शिंदे यांना पक्षात घेत त्यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे. त्यामुळे याचा मोठा धक्का रोहित पवार यांना बसला आहे. कारक की, राष्ट्रवादी पक्ष फुटल्यानंतर रोहित पवारांचे अनेक समर्थक देखील अजित पवार गटात सहभागी झाले होते. परंतु अक्षय शिंदे यांनी रोहित पवारांबरोबरच राहण्याला निर्णय घेतला होता. मात्र आता ऐन लोकसभा निवडणुकीच्या काळात अक्षय शिंदे यांनी रोहित पवारांची साथ सोडली आहे.
दरम्यान, यापूर्वी शरद पवार यांनी भूषणसिंहराजे होळकर यांना पक्षाचे स्थान दिले होते. आता लोकसभा निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी अजित पवारांनी धनगर समाजाला केंद्रस्थानी ठेवले आहे. याचाच एक भाग म्हणून शरद पवारांनंतर अजित पवार यांनीही अक्षय शिंदे यांना पक्षात प्रवेश दिला आहे. मूळचे जामखेड तालुक्यातील चौंडी येथील असणारे अक्षय शिंदे रोहित पवारांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जात होते. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत रोहित पवार यांच्या विजयामागे अक्षय शिंदे यांचा मोठा वाटा होता. आता याच अक्षय शिंदे यांनी अजित पवार गटात जाण्याचा निर्णय घेतला आहे.