अजित पवारांच्या एन्ट्रीमुळे शिंदे गटात नाराजी? नेमकं काय घडतंय?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक नाट्यमय घडामोडी घडत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आपल्या ३० पेक्षा अधिक समर्थक आमदारांसह शिंदे- फडणवीस यांच्या सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला आणि थेट उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. अजित पवार यांच्याव्यतिरिक्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या ८ नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली, मात्र अजित दादांच्या या अचानक एंट्रीमुळे शिंदे गटात मात्र अस्वस्थता वाढल्याचे समोर येत आहे. एका वृत्तवाहिनीने याबाबत वृत्त दिले आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी भूकंप घडणार का अशी शक्यताही निर्माण झाली आहे.

मागच्या वर्षी महाविकास आघाडीतून बाहेर पडताना शिंदेंच्या शिवसेनेच्या आमदारांनी अजित पवारांवर ठपका ठेवला होता. अजित पवार आम्हाला निधी देत नाहीत, तसेच आमच्या मतदारसंघात राष्ट्रवादीच्या उमेदवारांना ताकद देतात असा आरोप करत उद्धव ठाकरेंशी फारकत घेतली. मात्र आता शिंदेंच्या सरकारमध्ये अजित पवारांना अर्थखाते मिळण्याची शक्यता असल्याने शिवसेनेच्या आमदारांमध्ये अस्वस्थता आहे.

अजित पवार यांच्यासोबत ज्या नेत्यांनी शपथविधी घेतला ते सर्व दिग्गज नेते आहेत, त्यामुळे महत्वाची खाती राष्ट्रवादीकडे जाण्याचीही भीती शिंदे गटाला आहे. निधी वाटपावरून यापूर्वी झाले वाद पुन्हा एका उफाळून येऊ शकतात. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत शिवसेनेच्या मंत्री, आमदार आणि खासदारांनी आपल्या मनातली खदखद एकनाथ शिंदेंसमोर बोलून दाखवली. मात्र याबाबत फडणवीसांशी चर्चा करून मार्ग काढू असं आश्वासन एकनाथ शिंदेनी दिल्याचे समजते.