हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अजितदादा. खटक्यावर बोट जाग्यावर पलटी. पक्ष फोडला, चिन्हं, नाव आणि सगळे नेते आपले करून टाकले.. डबल इंजिनला तिसरं इंजिन जोडत उपमुख्यमंत्रीही झाले. अजितदादांनी पक्षात राहून शरद पवारांचा शिस्तीत केलेला कार्यक्रम पाहून अजितदादा राजकारणात शेरास सव्वाशेर आहेत, असं बोललं जाऊ लागलं. पण शिंदेंसारखीच त्यांचीही खरी कसोटी लागणार होती ती लोकसभेला. राष्ट्रवादी आपलीच हे ठासून सांगायचं असेल तर जास्तीत जास्त जागा निवडून आणणं एवढंच काम आता दादांना करायचं होतं. पण याच पॉइंटला डाव उलटा पडला. महायुतीत आपलं कसं सगळं खेळीमिळीने सुरूय हे दादा सारखं सांगत असले तरी शिंदे आणि फडणवीस या जोडगोळीने मिळून अजितदादांचा (Ajit Pawar) करेक्ट कार्यक्रम केलाय! लोकसभेच्या तोंडावरच दादांना शिंदे अन् फडणवीसांनी कसं चक्रव्युव्हात अडकवलंय? कमळ आणि धनुष्यबाणाच्या नादात घड्याळाच्या काट्यांची वेळ कशी चुकलीय?
पालघरची जागा सोडली. तर महायुतीचं जागावाटप जवळपास पूर्ण झालंय. भाजपला 28, शिवसेनेला 15 तर अजितदादांच्या राष्ट्रवादीला अवघ्या 4 जागा जागा वाटपात मिळाल्या आहेत. 28 – 15 – 4 या फॉर्म्युल्यातून हे स्पष्ट होतं की अजितदादांच्या राष्ट्रवादीचं शिंदे आणि फडणवीसांकडून खच्चीकरण करण्यात आलंय. पक्षाचं नाव आणि चिन्हं दोन्ही मिळवून सुद्धा जागा वाटपाच्या बार्गेनिंग मध्ये अजितदादा बॅकफूटवरच राहिले. दुसरीकडे सगळा पक्ष संपूनही नव्या नाव आणि चिन्हासह शरद पवारांची तुतारी 10 जागांवर निवडणूक लढतेय. शिंदे 15 जागा तर ठाकरे 16 जागांवर मैदानात आहे. म्हणजे शिंदे आणि ठाकरे यांच्या शिवसेनेची ताकद समसमान असताना घड्याळावर अन्याय का? असा प्रश्न आता दादा समर्थकांना पडला आहे… शिंदे फडणवीसांकडून अजितदादांचा असा टप्प्यात कार्यक्रम का करण्यात आलाय याची तशी बरीच कारण सांगता येतील…
यातलं पाहिलं कारण म्हणजे राष्ट्रवादीचं पश्चिम महाराष्ट्रापुरतं सिमित राजकारण…
सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल वगळता राष्ट्रवादीनं लोकसभेला नेहमीच सहकार आणि साखरपट्टा असणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रावर भर दिला. पण त्यातही यातल्या बहुतांश मतदारसंघावर शरद पवारांच्या नावाची जादू चालत आलीय. म्हणूनच मविआमध्ये पश्चिम महाराष्ट्रातून सर्वाधिक जागा तुतारीला सोडण्यात आल्या. याउलट महायुतीमध्ये याच पट्टयात तिकीट वाटपावरून उरफोड सुरू होती. या भागातील अनेक स्टॅंडिंग खासदार शिंदे गटात किंवा भाजप सोबत असल्यानं त्या जागांवर पहिला क्लेम त्यांचाच राहिला. सातारा आणि मावळच्या जागेसाठी अजितदादा गटाने जोर लावला होता, कार्यकर्त्यांनी बरंच ताणून धरलं पण भाजपच्या शब्दापुढे घड्याळाचं काही एक चाललं नाही. आणि इथेच अजितदादा बॅकफुटला पडले…
यातली दुसरी गोष्ट ती म्हणजे अजितदादांचं डिसिजन मेकिंगमध्ये नसणं…
महायुतीचं जागावाटप सुरू होतं तेव्हा एक गोष्ट सगळ्यांच्या ध्यानात आली. ती म्हणजे दिल्लीतून मोदी शहांच्या आदेशावर महाराष्ट्राचं जागावाटप ठरत होतं. आपल्या पक्षाच्या जागा कुठल्या असणार हे तर ठरवलं जात होतंच पण त्यासोबतच शिंदे आणि अजित दादा यांना कुठल्या जागा सोडायच्या? एवढंच काय त्यांना उमेदवार सुचवण्यापर्यंत सगळं काही दिल्लीतून ठरत होतं. त्यामुळे दिल्लेश्वरांच्या कृपेने जितक्या जागा मिळाल्या तितक्या दादांनी पदरात पाडून घेतल्या. काही जागांसाठी अजितदादांनी हट्ट धरला देखील पण तरीही दिल्लीतून जो निकाल येईल, तो मान्य केल्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय नव्हता. अशी एकूणच परिस्थिती होती. दुसरीकडे शरद पवार यांच्या सुपीक कल्पनेतूनच महाविकास आघाडीचा जन्म झालाय. त्यात तिकीट वाटपाच्या चर्चांमध्ये किंगमेकरच्या आणि वरिष्ठ सल्लागाराच्या नात्याने पवारच सगळी भूमिका बजावत होते. त्यामुळे पवारांना ज्या जागा हव्या होत्या त्या त्यांनी आपसूकच पदरात पाडून घेतल्या. थोडक्यात अजितदादांचं डिसिजन मेकिंगच्या प्रोसेसमध्ये नसणं यामुळे तिकीट वाटपावेळी त्यांना तोट्यात राहावं लागलं.
तिसरी गोष्ट म्हणजे उमेदवारांची असणारी कमतरता
निवडणूक लढवण्यासाठी इच्छुकांची गर्दी नेहमीच असते. पण हमखास निवडून येईल, किंवा तगडी फाईट देईल असा हुकमी एक्का आपल्या सोबत असणं महत्त्वाचं असतं. अजित दादांसोबत आलेल्या नेत्यांमध्ये सुनील तटकरे वगळता बाकीचे खासदार शरद पवारांसोबतच होते. त्यातही दादांसोबत मुरलेले नेते असले तरी त्यांच्या महत्त्वकांक्षा या लोकसभेच्या नव्हत्या. आमदारकीतच त्यांचा राम होता. म्हणूनच की काय आपल्या वाट्याला आलेल्या जागांसाठीही उमेदवार मिळवण्यासाठी अजितदादांना बरीच कसरत करावी लागली. कट्टर विरोधक असलेल्या आढळराव पाटलांना शिवसेनेतून आयात करून राष्ट्रवादीच्या तिकिटावर उमेदवारी द्यावी लागली. उदयनराजेंनाही साताऱ्यात घड्याळाच्या चिन्हावर लढण्यासाठी प्रयत्न झाले. दुसरीकडे भाजप आणि शिवसेनेकडे खासदारांची इस्टॅब्लिश फळी होती. उलट बहुतांश जागांवर शिवसेनेला जागा सोडायची? की भाजपला? यावरूनच बरीच भांडे फोड झाली. यात अजितदादांची राष्ट्रवादी लांब लांब पर्यंत कुठेच नव्हती…
राष्ट्रवादीचा गेम करणारी चौथी गोष्ट ठरली ती म्हणजे अजितदादांची कमी पडलेली बार्गेनिंग पॉवर
महायुतीचं तिकीट वाटप दिल्लीतून ठरत होतं हे आपण पाहिलंच. पण असं असताना देखील पक्ष जिवंत ठेवण्यासाठी जास्तीत जास्त निवडणुका लढवाव्या लागतात. हरणाऱ्या जागांवरही डाव खेळावा लागतो. शिंदेंनी हे बरोबर हेरलं होतं. ठाकरेंबरोबर सहानुभूतीची लाट आहे, हे माहीत असताना देखील शिंदेंनी जास्तीत जास्त जागा मिळवण्याचा अट्टाहास धरला. ज्या ठिकाणी ठाकरेंचे उमेदवार होते त्याच ठिकाणी आपली पडती बाजू असताना देखील शिंदे त्याच जागेसाठी अडून बसले. विशेष म्हणजे ज्या जागांचा तिढा बराच वाढला होता. त्यात छत्रपती संभाजीनगर, ठाणे, मुंबई दक्षिण, नाशिक या जागांवरून तर शिवसेना आणि भाजपचा काडीमोड होईल की काय अशी चिन्ह असताना देखील शिंदेंनी ताणून धरलं. आणि शेवटच्या मिनिटाला तब्बल 15 जागा आपल्या पदरात पाडून घेतल्या. याच्या अगदी उलट परिस्थिती पवारांची होती. अजितदादांनी सातारा, मावळ, नाशिक या जागांसाठी हट्ट धरला पण शिंदेंसारखी बार्गेनिंग करायला ते कमी पडले.
शेवटचा मुद्दा म्हणजे अजितदादांचा दोनच मतदारसंघामध्ये अडकून पडलेला जीव
बारामतीतून पत्नी सुनेत्रा वहिनी पवार यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवून अजित दादांनी नणंद – भावजयी अशी प्रतिष्ठेची लढत केली होती. दुसरीकडे आढळरावांना सोबत घेऊन अमोल कोल्हेंना पाडण्याचा शब्द देऊन शिरूरही अटीतटीची झाली होती. यामुळे झालं काय की अजितदादांसोबत त्यांच्यासोबत आलेल्या नेत्यांनाही जीव या दोन मतदारसंघातच आंबून गेला होता. बारामतीत तर काट्याला काटा असल्यामुळे जवळपास सगळीच यंत्रणा बारामतीत लावायला लागली. यामुळे अजितदादा बारामतीत अडकून पडले आणि शिंदे फडणवीस यांनी आपल्याला जास्तीत जास्त उमेदवार कसे मिळतील यासाठी प्रयत्न केले. या सगळ्यात अजितदादा कुठल्याच सीन मध्ये नव्हते…
एकूणच राष्ट्रवादीचं पश्चिम महाराष्ट्रापुरतं असणारे सीमित राजकारण, अजितदादांचं डिसिजन मेकिंगमध्ये नसणं, उमेदवारांची कमतरता, अजित दादांची कमी पडलेली बार्गेनिंग पॉवर आणि बारामती – शिरूर या दोनच मतदारसंघांमध्ये अडकून पडलेला जीव यामुळे अजितदादांचा कळत नकळतपणे शिंदे फडणवीसांकडून गेम झाला, असं म्हणायला बराच स्कोप उरतो…बाकी लोकसभेला कमी जागा लढवून अजित पवार स्वतःच्या हाताने राष्ट्रवादीला डॅमेज करतायत का? तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं, प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.