हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकसभेच्या फायनल निकालाला अवघे दोन दिवस शिल्लक असताना एक्झिट पोलचा निकाल आता समोर आलाय. महाराष्ट्रात नेमकं कुठून कोण आघाडी घेतय? याच स्पष्ट चित्र या एक्झिट पोलमधून दिसू लागलय. देशात पुन्हा एकदा मोदींची गॅरंटी चालली असली तरी महाराष्ट्रात मात्र महाविकास आघाडीच्या बाजूने जनतेचा कौल दिसतोय. त्यातही शिंदे आणि अजितदादांनी केलेलं बंड जनतेला पटलेलं नाही, म्हणूनच त्यांच्या जागांमध्ये घट झाल्याचं एक्झिट पोल मध्ये दिसतंय. पण सर्वात जास्त कमाल झालीये ती अजित पवारांच्या राष्ट्रवादीची. महाराष्ट्राच्या महानिकालात त्यांच्या राष्ट्रवादीला अवघ्या एका जागेवर यश येईल असं जवळपास सर्वच पोलच म्हणणं आहे. त्यामुळे आता ही एक जागा कुठली? याचं कोडं सगळ्यांनाच पडलंय. त्यामुळे इन डेप्थ मध्ये जाऊन अजित पवार नेमका कुठला गड राखतायेत? तेच समजून घेऊयात.
महाराष्ट्रातील जवळपास सर्वच महत्त्वाच्या एक्झिट पोलमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीला शून्य ते एक जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आलाय. तसं पाहायला गेलं तर अजित पवार यांच्या वाट्याला लोकसभेच्या चार जागा आल्या होत्या. त्यात रायगड मधून सुनील तटकरे, शिरूर मधून शिवाजीराव आढळराव पाटील, धाराशिव मधून अर्चना पाटील तर सर्वात जास्त प्रतिष्ठेच्या बनलेल्या बारामतीतून सुनेत्रा पवार या लोकसभेच्या मैदानात होत्या. यातला धाराशिवच्या अर्चना पाटील यांचा अपवाद वगळता बाकीच्या तीनही मतदारसंघात अजितदादा रेसमध्ये होते. बारामती, शिरूर आणि रायगडमध्ये नेमकं माप कुठल्या बाजूने झुकेल? हे सांगता येत नव्हतं. आता मात्र या तीन पैकी एकच जागा रेसमध्ये असून यावरच घड्याळाची टिकटिक वाजणारय… पण ती जागा कुठलीय यासाठी एक्झिट पोलच्या डिटेल्सला हात घालू…
प्रातिनिधिक स्वरूपात बोलायचं झालं रुद्र रिसर्च अँड ॲनालिटीक्स या संस्थेच्या एक्झिट पोलमध्ये मतदारसंघनिहाय कुणाचा विजय होतोय? मतांची टक्केवारी आणि विजयाचं मार्जिन कसं राहील. हे स्पष्ट सांगितलं आहे. यातल्या बारामती मतदारसंघात सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार यांच्यात घासून लढत झाली. कुणीही निवडून आलं तरी त्यांच्यातील विजयाचा मार्जिन फारसं नसेल अशी चर्चा इथून होती. त्यामुळे घड्याळ किंवा तुतारी जिंकेल असं उघडपणे कुणी बोलताना दिसत नव्हतं. आता मात्र एक्झिट पोलनुसार बारामतीकरांचा कौल हा तुतारीच्या बाजूने दिसतोय. सुप्रिया सुळे यांना 55% तर सुनेत्रा पवार यांना 41% मतदान होईल. आणि यात सुप्रिया सुळे तब्बल एक लाख 70 हजार, ते दोन लाख 30 हजार इतक्या लीडने विजय होतील असा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. त्यामुळे प्रत्यक्ष निकालात आकडेवारी वर खाली होत असली तरी विजयाच्या मार्जिनमध्ये फरक पडेल पण सुप्रियाताईच निवडून येतील, हे मात्र कन्फर्म दिसतंय. त्यामुळे अजित दादांनी प्रतिष्ठेची बनवलेली बारामती त्यांच्या हातातून एक्झिट पोल नुसार तर गेलीय…
दुसरा मतदारसंघ आहे तो शिरूरचा. इथेही लढत राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी होती. शिवसेनेच्या शिंदे गटातील आढळराव पाटलांच्या हातातील धनुष्यबाण बाजूला ठेवून त्यांना घड्याळाच्या चिन्हावर विद्यमान खासदार अमोल कोल्हेंच्या विरोधात लोकसभेच्या रिंगणात उतरवण्यात आलं. अजितदादांनी बारामतीनंतर सर्वात जास्त जोर कुठे लावला असेल तर तो शिरूरमध्येच. पण इथेही एक्झिट पोलनुसार स्पष्ट बहुमत अमोल कोल्हे यांच्या बाजूने जाईल हे स्पष्ट करण्यात आलय. कोल्हेंना 57% तर आढळरावांना अवघं 38% टक्के मतदान होऊन तुतारीच्या विजयाचं मार्जिन दोन लाखाच्या पुढे असेल असा स्पष्ट कौल देण्यात आलाय. त्यामुळे बारामती पाठोपाठ शिरूरही अजितदादांच्या हातातून जाणार असा अंदाज एक्झिट पोलचा आहे.
आता या तीन अटीतटीच्या मतदारसंघातील तिसरी जागा येते ती रायगडची…
इथून अजित पवार गटाचे सुनील तटकरे विरुद्ध शिवसेना ठाकरे गटाचे अनंत गीते एकमेकांच्या विरोधात उभे होते. एक्झिट पोलनुसार इथून सुनील तटकरे हे जिंकून येत असले तरी त्यांच्या विजयाचं मार्जिन हे अवघं 5 हजार ते 20 हजारच्या आसपास राहील, असा अंदाज वर्तवण्यात आलाय. त्यामुळे एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार अजित पवार गटाला जी एक जागा सुटतेय ती रायगडची आहे हे तर कन्फर्म होतंय. पण इथलं लीड अगदीच कमी असल्याने प्रत्यक्ष निकालात आकडा इकडे तिकडे जरी सरकला. तरी तटकरेंचे खासदार होण्याची चान्सेस कमी होतायत…
तर अशाप्रकारे अजित पवार गटाच्या वाट्याला कशीबशी एक जागा निवडून आणता येतेय खरी पण कमी मार्जिनमुळे त्याचीही गॅरंटी देणं जरा जास्त अवघड असल्यामुळे प्रत्यक्ष निकालातच रायगडची ही जागा अजित दादा जिंकतायेत का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे…शेवटी तुम्हाला काय वाटतं? रायगडची जागा सुनील तटकरे जिंकतील का? तुमचा अंदाज आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.