हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मला 100 टक्के मुख्यमंत्री होण्यास आवडेल, आता म्हटलं तरी मुख्यमंत्रीपदावर दावेदारी ठेवण्याची तयारी आहे असं विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी सकाळ माध्यम समूहा’तर्फे आयोजित ‘दिलखुलास दादा’ या प्रकट मुलाखतीमध्ये केलं होत. याबाबत शिवसेना खासदार संजय राऊत यांना विचारलं असताना अजित पवार हे मुख्यमंत्री होण्यास सक्षम आहेत असं उत्तर त्यांनी दिले. तसेच काही जण लायकी नसताना मुख्यामंत्री झाले असं म्हणत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही नाव न घेता निशाणा साधला.
जळगाव येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, मुख्यमंत्री व्हायला कोणाला आवडणार नाही. अजित पवारांमध्ये मुख्यमंत्री होण्याची क्षमता आहे. ते अनेक वर्षापासून राजकारणात आहेत. अनेक वर्ष ते मंत्री होते, सर्वाधिक वेळा उपमुख्यमंत्री होण्याचा विक्रम अजित पवारांनी केला आहे. त्यामुळे प्रत्येकाला वाटतं आपण मुख्यमंत्री व्हावं. अनेकजण लायकी नसताना जुगाड करून तोडफोड करून मुख्यमंत्री झाले. एखाद्याच्या भाग्यात लिहिलं असेल तर होत असतात. माझ्या अजितदादांना शुभेच्छा आहे, असं संजय राऊत यांनी म्हंटल.
दरम्यान,मी कुणाची वकिली करत नाही, मी महाविकास आघाडीची वकिली करतो. सध्यातरी आम्ही विरोधी पक्षात आहोत. त्यामुळे आत्ता तरी मुख्यमंत्री पदाचा विषय नाही. 2024 साली आम्ही परत सत्तेत येऊ, त्यावेळी बघू असे संजय राऊत म्हणाले. महाविकास आघाडी मजबूत आहे असं सांगायलाही ते विसरले नाहीत.