शेतीशिवाय मजा नाही | अक्षय चंद्रकांत फडतरे
सहकार क्षेत्र आणि सहकारी संस्था या नेहमीच भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये भरीव अस योगदान देत आलेल्या आहेत. महाराष्ट्रातील तसेच देशातील अनेक नेत्यांनी सहकारी संस्थांच्या जोरावरच शेतकऱ्यांच हित साधलं आहे. आता शेतकरी आणि सहकार याचा उल्लेख आला की सहकारी साखर कारखान्याचा उल्लेख हा येणारच, कारण शेतीच्या एकूण उत्पन्नामध्ये साखरेचे योगदान हे उल्लेखनीय आहे. महाराष्ट्रात बहुतांश शेतकारी हे ऊस शेतीला प्राधान्य देतात कारण ऊस हे एक नगदी पीक आहे. तसेच ऊसाला हमीभाव देखील आहे, ऊस शेती ही वेगवेगळ्या मातीत, वातावरणात करणं शक्य आहे. ऊस हा शेतातून थेट कारखान्यावर नेला जातो अशी विविध कारणं आहेत कि जी शेतकऱ्यांना ऊस शेती करण्यासाठी पूरक आहेत.
ऊस शेती ही वेगवेगळ्या मातीमध्ये, वातावरणात करता येते. शेतात आधी एखादं पिकाचे उत्पन्न घेतलं असेल तर रोटावेटरने मशागत करून नांगरून शेत काही दिवस उन्हात तापून दिले जाते जेणेकरून छोटे-मोठे कीटक, किडे, वेगवेगळे तण यांपासून नवीन पिकास त्रास होऊ नये. जर चांगलं उत्पन्न हवं असेल तर ही मशागत करण्यापूर्वी त्या शेतात ताग करतात आणि तो त्या रानातच गाडतात तर काही शेणखत, गांडूळखत देखील टाकतात.त्यानंतर सरी सोडणाऱ्या रेजरच्या साहाय्याने सरी सोडली जाते. काही शेतकरी चांगल्या परिणामासाठी सरी सोडून रोटावेटर ने अजून एकदा मशागत करतात. त्यामुळे तणाचा प्रादुर्भाव कमी होतो.
ऊसासाठी सरी सोडण्याचे पण आकारानुसार वेगवेगळे प्रकार आहेत. ३,३.५,४,४.५,५ फूट अशा वेगवेगळ्या आकाराच्या सरी ऊसासाठी सोडल्या जातात.
महाराष्ट्रात प्रामुख्याने Co ८६०३२, CoM ०२६५, MS १०००१, CoC ६७१ आणि काही संकरीत ऊसाच्या जाती केल्या जातात. प्रत्तेक जातीच्या ऊसाची recovery वेगवेगळी असते आणि त्यावरूनच ऊसाचा दर निश्चित होतो. प्रत्तेक कारखान्याला मग तो सहकारी असो किंवा खासगी याला FRP (Fixed Retail Price) ही ऊस उत्पादकाला द्यावीच लागते. FRP ही प्रति १००० किलो (१ टन ) ऊसासाठी निश्चित केली जाते. ऊस लागवड करताना ऊसाच्या कांड्याची लागवड किंवा ऊसाच्या रोपांची लागवड केली जाते.ऊसाच्या कांड्याची लागवड करण्यासाठी साधारण १०-१२ महिन्याच्या निरोगी ऊसाची निवड केली जाते कि जे ऊसाचे बियाणे म्हणून वापरले जाते.ऊसाच्या कांड्याची लागवड करताना एक डोळा पद्धत किंवा दोन डोळा पद्धतीने लागवड केली जाते. जर कांड्याची लागवड करायची असेल तर त्या बियाण्यावर बीजप्रक्रिया करतात. बीजप्रक्रिया करण्याची पारंपारिक पद्धत म्हणजे साधारण १००-२०० लीटर पाण्यामध्ये गूळ आणि असिटोबॅक्टस मिसळून त्यात ऊसाच्या कांड्या १५-२० मिनिटे भिजवल्या जातात. रासायनिक पद्धतीने करायचं झालं तर पाण्यात बुरशीनाशक, कीटकनाशक मिसळून त्यात ऊसाच्या कांड्या भिजवल्या जातात. परिणामी कीटक, बुरशी, हुमणी याचा प्रादुर्भाव होत नाही आणि ऊसाच्या कांड्याची प्रतिकारशक्ती वाढते. ऊसाच्या शेतीला पाणी पाजण्यासाठी सोडपाणी किंवा ठिबक सिंचन (drip irrigation) यापैकी एका पद्धतीचा उपयोग केला जातो. ठिबक सिंचनाचा जर उपयोग केला तर पाण्याची बचत होते, उत्पन्न चांगलं मिळत, औषधे व खते त्यामार्फत अगदी मुळाजवळ देता येतात,तण जास्त वाढत नाही. शासन देखील ठिबक सिंचनाला प्रोत्साहन देते.
लागवडीचा कालावधी : ऊस लागवडीचे प्रमुख ३ प्रकार पडतात.
१) आडसाली लागण – आडसाली लागण ही साधारण जून ते ऑगस्ट महिन्याच्या दरम्यान केली जाते. ही लागण तुटून जाईपर्यंत ऊस साधारण १६-१८ महिने कालावधी जातो. त्यामुळे ऊसाचे विक्रमी उत्पादन घेणे हे आडसाली लागणीमध्ये शक्य होते.
२) पूर्वहंगामी लागण – सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात जी लागण केली जाते त्याला पूर्वहंगामी लागण असे म्हणतात.
३) सुरुची लागण – नोव्हेंबर ते जानेवारी महिन्यामध्ये जी ऊस लागण केली जाते त्याला सुरुची लागण म्हणतात.
या ३ प्रकारापैकी आडसाली आणि सुरुची लागण हे दोन प्रकार जास्त प्रमाणात आढळतात. काही शेतकरी आपापल्या सोयीनुसार इतर वेळेला देखील ऊस लागण करतात. ऊस लागण करताना पुरेसा ओलावा केला जातो आणि ऊसाच्या कांड्या किंवा रोपं लावली जातात.
आळवणी :- आळवणी करताना रानात ओलावा असणे आवश्यक असते. आळवणीमध्ये प्रामुख्याने बुरशीनाशक, कीटकनाशक, ह्युमिक याचा समावेश असतो. ही औषधे हातपंप किंवा बॅटरी पंपच्या साहाय्याने ऊसाच्या बुडापाशी सोडली जातात. कांड्याची लागण उगवण्यास साधारण १४-२१ दिवस कालावधी लागतो. त्यामुळे कांड्याची लागण असेल तर साधारण २१ दिवसांनी आळवणी केली जाते. रोपांच्या लागणीसाठी आळवणीचा कालावधी हा ७-१० दिवसांचा असतो. जर आवश्यकता असेल तर अशी अजून एक आळवणी केली जाते.
खत व्यवस्थापन :- पहिला डोस – कांड्याची लागण असेल तर खताचा पहिला डोस हा साधारण ३० दिवसांनी दिला जातो, तर रोपांच्या लागणीसाठी हा कालावधी १५ दिवसांचा असतो. या डोस मध्ये युरिया,अमोनिअम सल्फेट आणि निंबोळी पेंड चा समावेश असतो.
दुसरा डोस :- दुसरा डोस हा फुटव्याचा डोस असतो. उगवून आलेल्या ऊसाच्या कोंबाला जास्तीत जास्त फुटवे यावेत यासाठी हा डोस असतो. कांड्याच्या लागणीसाठी साधारण ४५ दिवस तर रोपांच्या लागणीसाठी असा दुसऱ्या डोसचा कालावधी आहे. नायट्रोजन, फॉस्फरस,पोटॅशियम (N:P:K) प्रमाणात असलेले २४:२४:००,युरिया अशी खत या डोस मध्ये वापरतात.
तिसरा डोस :- तिसरा डोस हा बाळभरीचा डोस म्हणून ओळखला जातो. कांड्याच्या लागणीसाठी साधारण अडीच महिने तर रोपांच्या लागणीसाठी दोन महिने असा कालावधी योग्य असतो. युरिया,१०:२६:२६, १२:३२:१६, निंबोळी पेंड,मायक्रो न्युट्रीएंट, ग्रोथ रेग्युलेटर अशा खतांचा यात समावेश असतो.
चौथा डोस :- हा डोस फोडणीचा किंवा भरीचा डोस म्हणून ओळखला जातो. कांड्याच्या लागणीसाठी १२०-१३० दिवस तर रोपांच्या लागणीसाठी ९०-१०० दिवसांनी हा डोस दिला जातो. यात साधारण युरिया, DAP, पोटॅश, निंबोळी याचा एक डोस देतात. नंतर तो ऊस पॉवर ट्रेलर ने फोडला जातो, भर लावली जाते. त्यानंतर कॅल्शिअम, मॅग्नेशियम, सल्फर, निमसल्फेट, फेरस सल्फेट, मँगेनीज, बोरॉन असे सर्व घटक शेणखतात मिसळून ऊसाला दिले जातात. हा डोस ऊसाच्या दृष्टीने महत्वाचा असतो.
पाचवा डोस :- हा डोस साधारण पावसाळ्याच्या दिवसांत येतो म्हणून पावसाळी डोस म्हणून ओळखला जातो. कांड्याच्या लागणीसाठी साधारण १५०-१६० तर रोपांच्या लागणीसाठी १४०-१५० दिवसांनी हा डोस दिला जातो. यात युरिया, अमोनिअम सल्फेट,पोटॅश चा समावेश होतो. ठिबक सिंचन असेल तर वॉटर सोल्युबल खते,औषधे ही वेंचुरी मधून देता येतात. तसेच ऊसाच्या आणि जमिनीच्या गरजेनुसार इतर खतेदेखील ऊसाला दिली जातात.
पाणी व्यवस्थापन :- जर सोडपाणी पद्धत असेल तर १५-२० पाणी द्यावे. जर ठिबक असेल तर १०-१४ दिवसातून चांगला ओलावा होईल इतका वेळ पाणी चालू द्यावे. उन्हाळ्यात ठिबक च्या पाण्याने पिकाला पुरेसे पाणी मिळण्यास अडचण येते. अशा वेळेला महिन्यातून एकदा ठिबक सोबत सोडपाणी करावे. पावसाळ्यात शेतात पाणी जास्त साचून न राहता त्याचा निचरा योग्य प्रकारे कसा करता येईल यावर उपाययोजना करावी.
औषध फवारणी :- ऊसाची योग्य अशी वाढ व्हावी यासाठी वेगवेगळ्या औषध फवारणी केल्या जातात. ऊसाची वाढ ही पानांच्या आकारावर अवलंबून असते. पाने जेवढी रुंद, हिरवी तेवढं प्रकाशसंश्लेषण जास्त आणि वाढ देखील जास्त होते. त्यासाठी टॉनिक, संजीवके, zyme, अमिनो ऍसिड, ग्रोथ रेग्युलेटर, बायो स्टिमुलंट याची फवारणी केली जाते. त्यासोबतच कीटकनाशके व बुरशीनाशके यांचाही त्यात समावेश केला जातो. फवारणी वेळेस जमिनीत ओलावा आवश्यक असतो.
तण व्यवस्थापन :- ऊसामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे तण येत असते. ऊसात प्रामुख्याने काँग्रेस, वेल, शिपी, गवत, पांढरफूल,लव्हाळा अशा प्रकारचे तण आढळते.हे तण काढण्यासाठी कामगारांकडून खुरपणी करून घेतली जाते.कोंब नुकतेच उगवून आलेले असतील किंवा रोपं अजून चांगली स्थिरावली नसतील, ऊसात कोणतं आंतरपीक असेल तर अशा वेळेला खुरपणी करून घेतली जाते. पण जेव्हा ऊसाचा फुटवा चांगला झाला असेल तेव्हा तणनाशक ची फवारणी करून तण जाळता येते. तणनाशक फवारणी करताना जमिनीत ओलावा असणे गरजेचे असते.
रोग व कीड व्यवस्थापन :- ऊसाला बुरशीमुळे लाल तांबेरा, मर रोग, गवताळ वाढ असे रोग प्रामुख्याने होतात तर किडीमुळे लोकरी मावा, हुमणी, वाळवी, खोडकीड याचा प्रादुर्भाव होतो. वेगवेगळ्या रोगाची,किडीची लक्षण आणि त्यासाठी उपाय हे वेगवेगळे आहेत. म्हणून अशा वेळी कृषितज्ञांचा (B.sc agri) सल्ला घेऊन योग्य ते उपाय करावे.
ऊसतोडणी :- आडसाली ऊस हा साधारण १६-१८ महिन्यांनी तर पूर्वहंगामी व सुरूच्या लागणीचा ऊस हा साधारण १२-१४ महिन्यांनी तोडला जातो. ऊस तोडणी ही ऊस तोडणी कामगारांकडून किंवा ऊस तोडणी मशीन (हार्वेस्टर) च्या मदतीने केली जाते. लागणीचा ऊस तुटून गेला कि ऊसाची पाचट ही एकतर पेटवून दिली जाते नाहीतर गाडली जाते आणि ऊस दुसऱ्या वर्षासाठी (खोडवा) ठेवला जातो.
अक्षय फडतरे हे संख्याशास्त्राचे पदव्युत्तर पदवीधारक असून शेती करण्याची त्यांना विशेष आवड आहे. शेती आणि राजकारण हे त्यांच्या आवडीचे विषय आहेत. त्यांचा संपर्क क्रमांक – 9665162023