Ravindra Waikar Clean Cheat : रवींद्र वायकरांवरील सर्व गुन्हे मागे; मुंबई पोलिसांची क्लीन चीट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिंदे गटाचे नेते आणि मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचे नवनियुक्त खासदार रविंद्र वायकर (Ravindra Waikar) यांना मुंबई पोलिसांनी क्लीन चिट दिली आहे. तसेच त्यांच्यावरील सर्व गुन्हे मागे घेण्यात आले आहेत. जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरणी (Jogeshwari Plot Scam Case) वायकराना क्लीन चिट देण्यात आली आहे. याप्रकरणी EOW कडून कोर्टात सी समरी रिपोर्ट सादर करण्यात आला आहे. गैरसमजातून मुंबई महानगरपालिकेनं (Mumbai Municipal Corporation) गुन्हा दाखल केल्याचं मुंबई पोलिसांनी म्हटलं आहे. त्यामुळे रविंद्र वायकरांवरील सर्व गुन्हे मागे घेण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

रवींद्र वायकर यांच्यावर जोगेश्वरीतील भूखंड प्रकरणात गैरव्यवहाराचे आरोप झाले. सार्वजनिक वापरासाठीचा राखीव भूखंड लाटून त्यावर पंचतारांकित हॉटेल बांधण्याचा घाट घालून ५०० कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला होता. या गैरव्यवहारातून पालिकेचा महसूल बुडवल्याचा आरोप करत पालिका अभियंता संतोष मांडवकर यांच्या तक्रारीवरून आझाद मैदान पोलीस ठाण्यात रविंद्र वायकर, त्यांच्या पत्नी मनिषा, व्यावसायिक भागीदार आसू मेहलानी, राज लालचंदानी, प्रितपाल बिंद्रा, आर्किटेक्ट अरुण दुबे यांच्याविरोधात फौजदारी गुन्हा दाखल झाला होता. आता मात्र मुंबई महानगरपालिकेकडून दाखल झालेली तक्रार गैरसमजातून केल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे आर्थिक गुन्हे शाखेनं वायकरांना क्लीन चिट दिली आहे. वायकरांविरोधात करण्यात आलेल्या आरोपांमध्ये कोणतंही तथ्य आढळलं नाही. गैरसमजातून, चुकीच्या माहितीवरुन या प्रकरणात मुंबई महापालिकेन त्यांच्याविरोधात गुन्हा नोंदवला,’ असा निष्कर्ष आर्थिक गुन्हे शाखेनं काढला आहे

दरम्यान, लोकसभा निवडणुकीपूर्वी वायकर उद्धव ठाकरेंची साथ सोडून शिंदेसेनेत गेले. पक्षांतर करा, अन्यथा तुरुंगात जा, असे दोनच पर्याय माझ्यासमोर होते, असं वायकरांनी एका वृत्तवाहिनीला दिलेला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं. त्यानंतर आता त्यांना क्लीन चिट मिळाली असून त्यांची तुरुंगवारी टळण्याची शक्यता आहे. म्हणजेच विरोधात असताना जे वायकर भ्रस्ट होते तेच आता सत्तेत गेल्यानंतर क्लीन झाले कि काय असा प्रश्न यानिमित्ताने पडला आहे.