हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात भाजपला टक्कर देईल असा एकही पक्ष शिल्लक नाही. देशातील सर्व प्रादेशिक पक्ष नष्ट होतील, आणि फक्त भाजपच राहील असे खळबळजनक विधान भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी केलं आहे. तसेच महाराष्ट्रातील शिवसेना हा पक्षही संपत चालला आहे असं वक्तव्य त्यांनी केल्याने नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. बिहार येथील एका जाहीर सभेत ते बोलत होते.
अनेक राज्यांतून काँग्रेस आता संपत चालली आहे. विविध राज्यांमध्ये परिवारवादी प्रादेशिक पक्ष आहेत. उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्ष, बिहारमध्ये जनता दल, ओडिसामध्ये नवीन पटनाईक हे सगळे एका परिवाराचे पक्ष आहेत. महाराष्ट्रातही आता शिवसेना हा प्रादेशिक पक्ष संपत आहे. त्या पक्षातही घराणेशाही आहे. राष्ट्रवादी काँग्रेस हा देखील कुटुंबाचा पक्ष आहे. काँग्रेसही राष्ट्रीय पातळीवरील बहिण भावांचा पक्ष झालाय अशी टीका जेपी नड्डा यांनी केलं आहे.
भाजप सामान्य जनतेशी नाळ जुळलेला पक्ष आहे. आम्हाला वैचारिक पार्श्वभूमी आहे. भाजप हा विकासाचा समानार्थी शब्द आहे. आमच्याकडे विचार नसते तर आम्ही एवढी मोठी लढाई लढूच शकलो नसतो. त्यामुळे इथून पुढे सर्व पक्ष नष्ट होतील आणि राहील तो फक्त भाजप असे जेपी नड्डा म्हणाले