अभिमानास्पद! पाचही जिवलग मित्रांचे लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत घवघवीत यश; संपुर्ण महाराष्ट्रात कौतुक

Public Service Commission exam
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| नाशिक जिल्ह्यातील असंख्य विद्यार्थी आज स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून घवघवीत यश संपादन करताना दिसत आहेत. या सगळयामध्ये नाशिकच्या पाच मित्रांनी संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत या पाच मित्रांनी एकाच वेळी यश संपादन केले आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यात या पाच जणांचे विशेष कौतुक केले जात आहे. नाशिक जिल्ह्याच्या विविध भागातून येणाऱ्या आकाश दिपक बोढारे, अनिल भिमराव बत्तीशे, राहुल नानासाहेब पवार, राकेश कैलास निकम, शुभम नंदकुमार निकम या जिवलग मित्रांनी स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवत नाशिक जिल्ह्याचे नाव आज संपुर्ण महाराष्ट्रात मोठे केले आहे.

हे पाचही मित्र एकाच अभ्यासिकेमध्ये एकत्र अभ्यास करून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. आकाश दिपक बोढारे हा चांदवड तालुक्यातील शिंदे भयाळे येथील आहे. तो यावर्षीच्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत चांगल्या मार्कांनी उत्तीर्ण झाला आहे. आकाशची आज राज्यकर निरीक्षक आणि मंत्रालय क्लर्क अशा दोन जागांसाठी निवड झाली आहे. ज्यामुळे त्याचे संपूर्ण राज्यात कौतुक केले जात आहे. आकाश सोबतच अभ्यास करणारा त्याचा मित्र अनिल भिमराव बत्तीशे याने देखील दोन परीक्षांमध्ये घवघवीत यश मिळवले आहे. अनिल पोलीस उपनिरीक्षक आणि मंत्रालय क्लर्क अशा दोन्ही परीक्षांमध्ये उत्तीर्ण झाला आहे. अनिल मूळचा बोढारे गावातील आहे.

त्याचबरोबर या दोघांचा तिसरा मित्र राहुल नानासाहेब पवार याने देखील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवले आहे. त्यांची सलग दोन वर्षे मुंबईतील मंत्रालयात निवड झाली आहे. त्यामुळे आज त्याचे संपूर्ण गावात कौतुक केले जात आहे. राहुल मूळचा नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील करंजगाव येथील आहे. त्याचबरोबर, चौथा मित्र राकेश कैलास निकम याने दोन पदांची परीक्षा उत्तीर्ण केली आहे. त्याची मुंबई मंत्रालयात क्लर्क आणि कर सहाय्यक पदासाठी निवड झाली आहे. राकेश मूळचा दिंडोर तालुक्यातील मोहाडी गावातील रहिवासी आहे.

या चौघांचा मित्र शुभम नंदकुमार निकम याची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत मंत्रालय क्लर्क म्हणून निवड झाली आहे. शुभम देखील दिंडोरी तालुक्यातील रहिवासी आहे. या पाचही मित्रांनी एकत्र अभ्यास करून आज लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश संपादन केले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हे पाचही मित्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसाठी एकत्र अभ्यास करत होते. अखेर आज या पाचही मित्रांना त्यांच्या मेहनतीचे यश मिळाले आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून या पाचही मित्रांचे विशेष कौतुक केले जात आहे. तसेच, त्यांचा वेगवेगळ्या ठिकाणी सत्कार केला जात आहे.