कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
महाबळेश्वर येथील ग्रामिण रूग्णालयातील दोन वैदयकिय अधिकारी व तीन नर्स अशा पाच जागा गेली दोन वर्षे रिक्त असल्याने महाबळेश्वर शहरातील नागरीकांची आरोग्य सेवा व्हेंटिलेटरवर आहे. नगर परिषद व येथील ग्रामिण रूग्णालय याबाबत आपली जबाबदारी झटकत असल्याने महाबळेश्वर शहरास कोणी वाली राहीला नाही. हे विदारक सत्य समोर आले आहे. पालकमंत्री व गृहराज्यमंत्री हे जिल्हाभर फिरत आहेत. परंतु महाबळेश्वरकडे त्यांचे अद्याप लक्ष गेले नाही. तेव्हा या लोकप्रतिनिधींनी महाबळेश्वर सातारा जिल्ह्यातच आहे, त्यामुळे लक्ष द्यावे केवळ पर्यटनासांठी येवू नका अशी भावना शहरातील नागरिकांच्यातू व्यक्त केली जात आहे.
महाबळेश्वर येथील ग्रामिण रूग्णालयातील आरोग्य सेवेचे बारा वाजले होते, म्हणुन दोन वर्षांपुर्वी हे ग्रामिण रूग्णालय काही अटी आणि शर्थींवर रेड क्रॉस संचलित बेल एअर कडे हस्तांतरीत करण्यात आले. रूग्णालय ताब्यात घेताना या संस्थेने अनेक अटी मान्य केल्या होत्या. पंरतु आता त्यांना या बाबत सोईस्कर विसर पडला आहे. रूग्णालयात आलेल्या रूग्णांवर उपचार करण्या बरोबर राज्य व केंद्र शासनाच्या सर्व आरोग्य योजनांची अंमलबजावणी करण्याचे या संस्थेने मान्य केले होते. घरोघरी जावुन नागरीकांच्या आरोग्याची तपासणी करणे, कोणत्या घरातील व्यक्तीला कोणता रोग आहे याची नोंद करणे, माता संगोपन, कुपोषण, रोग निमुर्लन, लसिकरण, आरोग्य शिबीरांचे आयोजन आदी कार्यक्रम राबविण्याची जबाबदारी ही ग्रामिण रूग्णालयाची आहे. परंतु अलिकडे हे सर्व उपक्रम ग्रामिण रूग्णालयाने गुंडाळुन ठेवले आहेत. ज्यांना आरोग्य सुविधा हवी, त्यांनी रूग्णालयात यावे. आम्ही घरी येणार नाही, असा पवित्रा ग्रामिण रूग्णालय चालविण्यासाठी घेतलेल्या बेल एअर या संस्थेने घेतला आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने राबविण्यात येणारे हे उपक्रम कोण राबविणार असा सवाल आता येथिल नागरीकांना पडला आहे.
सध्या कोविड 19 ने देशात थैमान घातले आहे. जिल्हयातील रूग्णांचा आकडा रोज वाढत चालला आहे. सध्या अशा रूग्णांना तालुकयात कोठेच बेड उपलब्ध नाहीत. ऑक्सीजन व व्हेंटिलेटर उपलब्ध नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे. अशा वेळी बाहेरगावी कोविडचे रूग्ण पाठविताना ग्रामिण रूग्णालयाचे पत्र लागते ते देखिल वेळेवर मिळत नसल्याने अनेक रूग्ण व नातेवाईकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. मंगळवारी अशाच एका 76 वर्षिय महीला रूग्णाची उपचारा अभावी हेळसांड झाली. सुदैवाने उशिरा का होईना वयोवृध्द महिला रूग्णास रूग्णवाहीके मधील ऑक्सीजन सुविधा देण्यात आल्याने रूग्णाचा जीव वाचला.
ग्रामिण रूग्णालयातील दोन वैदयकिय अधिकारी व तीन नर्स यांच्या जागा रिक्त असल्याने आम्ही शहरात काम करू शकत नाही असा खुलासा बेल एअरच्या फादर टॉमी यांनी केला आहे परंतु आम्ही ग्रामिण भागात सार्वजनिक आरोग्य विभागाचे सर्व उपक्रम चांगल्या प्रकारे राबवित आहे असा दावाही फादर टॉमी यांनी केला आहे. ग्रामिण रूग्णालयातील रिक्त जागे संदर्भात आपण जिल्हाशल्य चिकित्सक यांचे बरोबर वारंवार बोललो आहे. त्या बाबत पत्र व्यवहार देखिल केला आहे परंतु महाबळेश्वर येथील ग्रामिण रूग्णालयातील रिक्त जागाकडे कोणी गांभिर्याने पहात नाही असही फादर टॉमी यांनी सांगितले.
जिल्हयाचे पालक मंत्री ना. बाळासाहेब पाटील तसेच गृहराज्य मंत्री ना. शंभुराज देसाई हे जिल्हाभर फिरत आहेत. तालुक्यातील सर्व अधिकारी यांच्या बैठका घेवुन सर्वत्र कोरोनाची स्थितीचा आढावा घेत आहेत. बैठकावर बैठका घेवुन दमल्या नंतर केवळ पर्यटनासाठी अथवा विश्रांतीची गरज असली की यांना महाबळेश्वरची आठवण येते. येथे आल्या नंतर ते फक्त विश्रांती घेणे पसंत करतात. पत्रकारांनी विचारले तर ते खाजगी दौऱ्यावर आहेत एवढेच सांगितले जाते. त्या मुळे महाबळेश्वर शहरास कोणी वाली राहीला नाही असेच म्हणावे लागेल.
सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा