हॅलो महाराष्ट्र | परभणी प्रतिनिधी
मागील काही वर्षापासून डिजिटल व्यवहारावर खातेदारांचा वाढलेला कल दिसून येत आहे. त्यातच कोरोनाच्या संसर्गाचा उद्रेक झाल्याने खुप मोठ्या प्रमाणात ग्राहक भिम युपीआय, योनो ॲप, मोबाईल बँकींग व नेट बँकींगकडे आकर्षीत झाले आहेत. या व्यवहारामध्ये आपणास आपला पासवर्ड हा नेहमी सुरक्षित राहण्यासाठी नेहमी सतर्कता बाळगली पाहीजे. अमेरिकापेक्षा भारतात ऑनलाईन व्यवहार व्यवस्था अधिक सक्षम ठरत आहे. असे असले तरी सर्व ग्राहकांनी जागरुकता बाळगत डिजीटल व्यवहार करताना नेहमी सुरक्षितता बाळगावी. असे आवाहन नाबार्ड बँकेचे अधिकारी प्रीतम जंगम यांनी केले आहे.
जागतिक ग्राहक दिनानिमित्त बँकींग प्रशिक्षणाचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात करण्यात आले होते.याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी आंचल गोयल, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक सुनिल हट्टेकर, वैधमापन शास्त्राचे परदेसी, जिल्हा पुरवठा अधिकारी मंजूषा मुथा, विलास मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
नाबार्ड बँकेचे अधिकारी जंगम म्हणाले की, आज मोठ्या प्रमाणात सुशिक्षीतांसह अल्पशिक्षीत व्यक्तींकडून भिम युपीआयचा वापर केला जात आहे. तसेच डिजीटल व्यवहारात फसवणुकीचेही नवनवीन प्रकार दररोज उघडकीस येत आहेत. त्यामुळे ग्राहकांनी आपल्या मोबाईलवर आलेला ओटीपी कुठल्याही व्यक्तीसोबत शेअर करु नये तसेच बँकेच्या अथवा आपणास माहिती भरावयाच्या संकेतस्थळावरही ते पेज फेक नसल्याची खात्री करुनच आपली माहिती भरावी जेणेकरुन फसवणूक होणार नाही. बँकेचा मोठ्या प्रमाणात आवाका वाढत जात असून बँक सखी व बँक मित्र हे मायक्रो एटीएमच्या माध्यमातून गावागावात सुविधा देत आहेत. जास्तीत जास्त लोकांपर्यत सेवा पोहचावी यासाठी नाबार्ड नेहमी प्रयत्न करता असते. भारतीय स्टेट बँकेचे योनो हे ॲप खुप अद्ययावत असून यातुन बऱ्याच सेवा उपलब्ध करुन दिल्याने आपणास प्रत्यक्ष बँकेच्या शाखेत जाण्याची आवश्यकता नाही त्यामुळे योनो ॲप कौतूकास्पद ठरत आहे. असेही त्यांनी यावेळी सांगितले.