हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल मालेगावातील एका कार्यक्रमात धर्मवीर आनंद दिघे यांच्याबाबतीत जी घटना घडली, त्याचा मी साक्षीदार आहे, ज्या दिवशी माझी मुलाखत होईल, त्यावेळी भूकंप होईल, असा इशारा दिला होता. त्यानंतर औरंगाबादचे शिवसेना आमदार अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा साधला आहे. “तुम्हाला आनंद दिघे यांच्या मृत्यूचं खरं कारण आणि त्यामागील सत्य माहिती होतं तर 25 वर्षे का बोलला नाहीत? असा सवाल दानवेंनी केला.
आ. दानवे यांनी माध्यमांशी संवाद साधला. मुख्यमंत्री शिंदेंवर टीका करताना ते म्हणाले की, आनंद दिघे यांच्या मृत्यूबाबत एवढी वर्ष यामागील कारण लपवून ठेवणं म्हणजे दिघेंच्याप्रती बेईमानीच केल्यासारखे आहे. यावेळी दानवे यांनी एक मागणीही केली. दिघे यांच्या मृत्यूमागचे सत्य शिंदे यांना माहिती असेल तर पोलिसांकडून त्यांची चौकशी झाली पाहिजे, असे दानवे यांनी म्हंटले.
एकनाथ शिंदे काय म्हणाले?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या राज्याच्या दौऱ्यावर आहेत. काल मालेगावमधील एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना आव्हान दिले होते. मी आज काही बोलणार नाही, पण समोरून तोंड उघडेल तर मग मलाही बोलावं लागेल. धर्मवीर आनंद दिघे यांच्याबाबतीत जी घटना घडली, त्याचा मी साक्षीदार आहे. आज ज्या मुलाखतीचा सपाटा चालू आहे, त्यावरही मी बोलणार नाही. ज्या दिवशी माझी मुलाखत होईल, त्यावेळी भूकंप होईल, असा इशारा शिंदे यांनी दिला.