Tuesday, June 6, 2023

शिवाजी विद्यापीठच्या अधिसभा सिनेट निवडणुकीत कराडचे अमित जाधव विजयी

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरची सन 2022 ते 2027 कालावधीसाठी झालेल्या अधिसभा सिनेट निवडणुकीत कराडचे अमित जाधव हे नोंदणीकृत पदवीधर मतदारसंघातून पहिल्या पसंतीची 1 हजार 701 मते घेऊन मोठ्या फरकाने निवडून आले. सदर निवडणुकीसाठी दि. 14 नोव्हेंबर रोजी मतदानप्रक्रिया पार पडली. सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे 33 मतदान केंद्रावर मतदान झाले. त्यांनतर दि. 16 नोव्हेंबरं रोजी मतमोजणीप्रक्रिया घेण्यात आली. सदर निवडणूक ही पसंतिक्रम नोंदवून घेण्यात आले होते त्यामुळे मतमोजणी प्रक्रिया सुमारे 36 तासाहून जास्त वेळ चालली.

नोंदणीकृत पदवीधर मतदारसंघात सुमारे 11131 पदवीधरांनी मतदान केले होते. या मतदारसंघातून 10 उमेदवार निवडून द्यायचे होते. त्यापैकी 9 उमेदवार हे डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील यांचे अध्यक्षतेखालील विद्यापीठ विकास आघाडीचे निवडून आले. तर विरोधी आघाडीचा फक्त 1 उमेदवार निवडून आला. आजपर्यंत सिनेट अधिसभा निवडणुकीत नेहमीच कोल्हापूर जिल्ह्याचे वर्चस्व दिसून आले आहे. परंतु या निवडणुकीत पहिल्यांदाच पदवीधर मतदारसंघातून सातारा आणि सांगली जिल्ह्यातून एकमेव तासवडे (ता. कराड) गावचे सुपुत्र अमित जाधव यांना शिवाजी विद्यापीठ विकास आघाडीतर्फे उमेदवारी देण्यात आली होती. इतर सर्व निवडून आलेले 9 उमेदवार हे कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत. सातारा, सांगली आणी कोल्हापूर असे तीन जिल्ह्यांचे कार्यक्षत्र असल्याने सदर निवडणुकीला विशेष महत्व प्राप्त झाले होते. या तिन्ही जिल्ह्यातील विविध महाविद्यालये या अंतर्गत येतात. विद्यार्थी, पदवीधर, प्राध्यापक, कर्मचारी आणी संस्थांचालक यांना भेडसवणारे प्रश्न, शैक्षणिक धोरण, विद्यापीठ अर्थसंकल्प , परीक्षा आदी महत्वपूर्ण बाबींवर अधिसभा सिनेट मध्ये निर्णय घेण्यात येतात. अमित जाधव हे गेल्या बारा वर्षांपासून काँग्रेसच्या विद्यार्थी ( NSUI ) व युवक संघटनेत काम करीत आहेत. सध्या ते सातारा जिल्हा युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष आहेत.

विद्यापीठांतर्गत येणाऱ्या सर्व घटकांचा आवाज बनून मी नक्की अधिसभेत हक्काने प्रश्न उपस्थित करून त्यावर न्याय मिळवून देईन अशी प्रतिक्रिया अमित जाधव यांनी विजयी झालेवर दिली. तसेच मला सदर ठिकाणी काम करणेची संधी उपलब्ध करून दिली. त्याबद्दल महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण, माजी गृहराज्यमंत्री आ. सतेज उर्फ बंटी पाटील, विद्यापीठ विकास आघाडीचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, आ. ऋतुराज पाटील, आ. जयंत आसगावकर यांचे आभार मानले.

सदर विजयाबद्दल त्यांचे महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे, शिवाजी शिक्षण संस्थेचे प्रकाश बापू पाटील, डॉ. डी. आर मोरे, भैया माने, धैर्यशील बाबा पाटील, अमित कुलकर्णी, देवराज दादा पाटील, उदयसिंह पाटील, चित्रलेखा कदम, अमरसिंह पाटणकर, निवास थोरात, सचिन बेडके – सूर्यवंशी, संजीव चव्हाण, पृथ्वीराज गोडसे, डॉ.सूर्यकांत केंगार, प्राचार्य एल. जी. जाधव , प्राचार्य मोहन राजमाने आदीनीं अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.