हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : महाविकास आघाडीला अपवित्र युती म्हणणारे अमित शाह म्हणजे काही ब्रह्मदेव नाहीत, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली. काश्मीरमध्ये तुम्ही मेहबुबा मुफ्ती यांच्याशी युती केली. तेव्हा तुम्ही कुठल्या पवित्र संबंधात जोडले गेले होता? असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी भाजपला केला.
जितेंद्र आव्हाड मंगळवारी (20 एप्रिल) ठाण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली. “महाविकास आघाडीतील तीनही पक्षांनी कुंभमेळ्यात तुमच्याप्रमाणे अंघोळ करून कोरोनाचा संसर्ग फैलावण्यास मदत केली नाही. आता केवळ कुंभमेळ्यात अंघोळ न केल्यामुळे आम्हाला अपवित्र ठरवले जात असेल तर आम्हाला ते चालेल”, असा टोला आव्हाड यांनी लगावला.
“आपण बोलण्यापेक्षा महाराष्ट्राला ऑक्सिजन पुरवठा जो जबरदस्तीने कमी केला आहे तो जरा व्यवस्थित करा. तसेच महाराष्ट्र्राला रेमडेसिवीर देण्याबाबत जे राजकारण केले गेले आहे ते जरा बंद करा. कमी लोकसंख्या असणाऱ्या गुजरातला व्हेंटिलेटर दिले. आम्हाला दुपटीने देऊ नका. मात्र गरज आहे तेवढी तरी द्या. तेव्हा महाराष्ट्राचा गळा दाबण्याचा काम करून महाविकास आघाडीला अपवित्र म्हणण्यापेक्षा इथली माणसे मारणार नाही, याची काळजी घ्या”, अशा शब्दात आव्हाड यांनी सुनावलं.
अमित शहा यांनी ‘टाइम्स नाऊ’ला विशेष मुलाखत दिली. त्यात त्यांना राज्यातील ठाकरे सरकार किती दिवस चालेल असा सवाल करण्यात आला होता. त्यावर शहा यांनी थेट उत्तर दिलं. शिवसेनेने आमच्या सोबत निवडणूक लढवली होती. शिवसेना हा आमचा छोटा मित्र पक्ष होता. त्यांनी आम्हाला मुख्यमंत्रीपदावर दावा करण्याची मोकळीक दिली होती. हे सरकार त्यांच्या ओझ्यानेच कोसळेल, असा आमचा विश्वास आहे. आम्हाला काहीही करावं लागणार नाही, असं शहा म्हणाले.
शहा यांनी अगदी मोजक्याच शब्दात आपली भूमिका मांडली आहे. परंतु, त्यातून त्यांनी शिवसेनेला डिवचले आहे. या मुलाखतीत त्यांनी शिवसेनेला छोटा मित्र पक्ष म्हटलं आहे. महाराष्ट्रात शिवसेना-भाजप युतीत शिवसेना हाच मोठा पक्ष राहिला आहे. किंबहुना शिवसेनेच्या खांद्यावरच राज्यात भाजप मोठा झाला आहे. फक्त गेल्या दहा वर्षात राजकीय वारं बदलल्याने त्याचा फटका शिवसेनेला बसला. त्यामुळेच शहा यांनी शिवसेनेला डिवचण्यासाठी शिवसेनेला छोटा मित्र पक्ष म्हटलं आहे, असं राजकीय निरीक्षक सांगतात. ठाकरे सरकार आपल्याच ओझ्याने कोसळणार असल्याचं शहा यांनी म्हटलं आहे. त्यांनी थेट भाजप सरकार पाडणार असं म्हटलं नाही. मात्र, ठाकरे सरकार कोसळणार हे सांगून त्यांनी बरेच संकेत दिले आहेत, असं राजकीय विश्लेषकांनी सांगितलं. त्यामुळे शहा यांच्या वक्तव्यावरून तर्कवितर्क लढवले जात आहेत.