हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात शिंदे- फडणवीस यांचे सरकार आलं असलं तरी अजून मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. शिंदे सरकार मध्ये कोणाला कोणते खाते मिळणार हे अद्यापही गुलदस्त्यात आहे. मात्र राज ठाकरेंच्या मनसेला या सरकारमध्ये मंत्रिपद मिळू शकते अशा चर्चा काही दिवसांपासून सुरु आहेत. त्याच पार्श्वभूमीवर राज टकरे त्यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांनी एक मोठं विधान केलं आहे. गृहमंत्रीपद देणार असतील तर सत्तेत सहभागी होऊ असं विधान अमित ठाकरेंनी केलं.
अंबरनाथ इथल्या प्राचीन शिवमंदिरात दर्शन घेतल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांना मंत्रिपदांच्या चर्चेबद्दल विचारण्यात आलं असता त्यावर उत्तर देताना गृहमंत्रीपद देणार असतील तर सत्तेत सहभागी होऊ. पण ते देत नाहीये अशी मिश्किल टिप्पणी अमित ठाकरे यांनी केली.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि मनसे मध्ये जवळीक वाढली आहे. राज ठाकरेंनी आपल्या जाहीर सभांमध्ये उद्धव ठाकरे आणि शरद पवारांवर जोरदार टीका केली मात्र भाजपबद्दल त्यांनी एक शब्दही काढला नव्हता. तसेच नुकत्याच पार पडलेल्या राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुकीत देखील आपलं मत भाजप उमेदवाराच्या पारड्यात टाकलं होत. मागील आठवड्यात देवेंद्र फडणवीस यांनी थेट कृष्णकुंज वर जाऊन राज ठाकरेंची भेट घेतली होती. त्यामुळे शिंदे- फडणवीस सरकारमध्ये एकमेव आमदार असलेल्या मनसेला मंत्रिपद मिळणार अशा चर्चाना उधाण आले आहे.