हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेनेचे खासदार गजानन कीर्तिकर यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडून शिंदे गटात प्रवेश केला आहे. मात्र त्यांचे सुपुत्र अमोल कीर्तिकर यांनी मात्र ठाकरेंसोबतच राहायचं ठरवलं आहे. आज शिवसेनेने गोरेगावात तातडीने एका बैठकीचं आयोजन केलं होतं. यावेळी गजानन कीर्तिकर यांचे चिरंजीव अमोल कीर्तिकरही या बैठकीला उपस्थित होते. याबाबत त्यांनी फेसबुकवर पोस्ट शेअर केली आहे.
शिवसेनेचे जेष्ठ नेते सुभाष देसाईसाहेबांच्या नेतृत्वाखाली गोरेगाव विधानसभेतील पदाधिकाऱ्यांची बैठक आज संपन्न झाली. यावेळी शिवसेनेच्या भविष्यातील वाटचालीसंदर्भात देसाईसाहेबांनी मार्गदर्शन केले. येत्या महापालिका निवडणुकीत पक्षप्रमुख उद्धवसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली गोरेगाव विधानसभेतील सर्व प्रभागातून शिवसेनेचे उमेदवार निवडून आणण्याचा निर्धार केला अशी पोस्ट अमोल कीर्तिकर यांनी केली आहे.
दरम्यान, गजानन कीर्तिकर यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानांतरही त्यांच्या मुलाने मात्र ठाकरेंनाच पाठिंबा दिल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. मात्र आपण मुलावर कोणतंही बंधन घातलं नसल्याचं गजानन कीर्तिकर यांनी स्पष्ट केलंय. त्याच्यात आणि माझ्यात कुठला वादही नाही. मी त्याला म्हटलं मला जायचंय. हे काही मला सहन होत नाहीये असं ते म्हणाले.