नवी दिल्ली । अम्फान या वादळाचा सामना करण्यासाठी केंद्र आणि संबंधित राज्य सरकारने पूर्ण तयारी केली आहे. एनडीआरएफच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या असून नौदल आणि भारतीय सैन्यही अलर्टवर आहे. नागरिकांना आता सुरक्षित स्थळी हलवण्यावर भर दिला जात आहे याच पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासोबत फोनवर चर्चा केली. यावेळी अमित शहा यांनी ममता बॅनर्जी यांना केंद्राकडून पूर्ण मदतीची हमी दिली. २१ वर्षात पहिल्यांदाच येत असलेल्या या भीषण चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी सरकार सक्रिय झालं आहे.
२० मे रोजी अम्फान वादळ पश्चिम बंगाल आणि बांगलादेशचया हटिया बेट यांच्यामधून अत्यंत रौद्र रुप धारण करुन जाण्याची शक्यता आहे. मंगळवारी या वादळाचा वेग कमी होण्याचाही अंदाज आहे. कोलकाता, हावडा, पूर्व मिदनापूर, उत्तर आणि दक्षिण २४ परगना आणि हुगळी या जिल्ह्यांमध्ये पावसाचाही अंदाज वर्तवण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार, अम्फान वादळ हे पश्चिम बंगालमधील दीघा आणि बांगलादेशातील हटिया बेटाच्या मधून सुंदरबनला धडक देणं अपेक्षित आहे. किनाऱ्याला धडक देताना वादळाचा वेग १५५ ते १६५ किमी प्रति तास असू शकतो. मंगळवार सायंकाळ किंवा बुधवारपर्यंत या वादळाचा वेग १८५ किमी प्रति तास होईल. या पार्श्वभूमीवर कुणीही समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये, अशी सूचना ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये देण्यात आली आहे.
वादळाचा सामना करण्याची आपत्कालीन यंत्रणा सज्ज
गृह मंत्रालयाच्या माहितीनुसार, राज्य आणि केंद्राच्या यंत्रणांच्या तयारीचा आढावा घेतल्यानंतर धोकादायक ठिकाणच्या नागरिकांना तातडीने हलवण्यात यावं, असे निर्देश कॅबिनेट सचिवांकडून देण्यात आले आहेत. अन्न, पाणी आणि औषधे अशा विविध अत्यावश्यक सेवांच्या पूर्ततेची तयारीही केली जात आहे. अम्फान वादळाचा सामना करण्यासाठी एनडीआरएफच्या ३६ तुकड्या ओदिशा आणि पश्चिम बंगालमध्ये तैनात करण्यात आल्या आहेत. याशिवाय सैन्य, नौदल आणि नौदलाच्या जहाजांसह नौदलाचे विमाने, हवाई दल आणि तटरक्षक दलालाही सज्ज राहण्यास सांगितल्याची माहिती गृह मंत्रालयाने दिली.
NDRF चे महासंचालक एस एन प्रधान यांनी सोमवारी दिलेल्या माहितीनुसार, ‘अम्फान’ वादळाचा धोका लक्षात घ्यायला हवा. कारण बंगालच्या खाडीतून आलेल्या मोठ्या चक्रीवादळाचा सामना करण्याची भारताची ही दुसरी वेळ आहे. कच्ची घरं, घरांची कच्चे छत, नारळांची झाडं, टेलिफोन आणि वीजेचे खांब यांना मोठ्या प्रमाणात या वादळाचा फटका बसू शकतो. १९९९ मध्ये आलेल्या सुपर सायक्लोनमध्ये ९००० हून अधिक जणांनी प्राण गमावले होते.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”