हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्र सरकारने वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन (Vande Bharat Express)नंतर आता अमृत भारत एक्सप्रेस ट्रेन (Amrit Bharat Express) आणली आहे. येत्या ३० डिसेम्बरला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या अमृत भारत एक्सप्रेस चे लोकार्पण करणार आहे. ही ट्रेन नेमकी कशी असणार ? ती सर्वसामान्यांना परवडेल का ? तिच्यात काय सुविधा असतील ? असे अनेक प्रश्न तुमच्या मनात निर्माण झाले असतील. या दोन्ही ट्रेनमध्ये नेमका कोणता फरक आहे ? हे आपण समजावून घेऊ.
अमृत भारत एक्सप्रेस ट्रेनची वैशिष्ट्ये –
केंद्र सरकारने देशात दळणवळण वेगवान व्हावे व सर्व रेल्वे प्रवाशांना योग्य त्या सोयी मिळाव्यात यासाठी नवीन, सोयीयुक्त रेल्वे गाड्या आणण्याचा मानस पूर्ण केला आहे. वंदे भारत एक्सप्रेस वेगवान व सर्व सोयींनी युक्त असली तरी तिचे प्रवासी भाडे सर्वसामान्य व गरीब लोकांना परवडणारे नाही. सर्वसामान्यांचा हा आर्थिक त्रास वाचावा यासाठी केंद्र सरकार अमृत भारत एक्सप्रेस ही नवीन ट्रेन 30 डिसेंबर रोजी आणत आहे. केशरी रंगाची ही ट्रेन आकर्षक असून तिचा वेग प्रति तास 130 किलोमीटर आहे. अमृत भारत एक्सप्रेसचा मार्ग दरभंगा ते दिल्लीमार्गे अयोध्या असा असणार आहे. त्याच दिवशी दुसरी अमृत भारत एक्सप्रेस ट्रेन मालदा ते बंगळुरू अशी धावणार आहे.
अमृत भारत मध्ये काय सुविधा मिळणार-
अमृत भारत एक्सप्रेस ट्रेनमध्ये एकूण 22 डबे असून एसी आणि नॉन एसीसह सामान्य द्वितीय श्रेणी – 8, द्वितीय श्रेणी 3-स्तरीय स्लीपर कोच -12, गार्ड कंपार्टमेंट – 2 असे ते डबे आहेत. सामान्य द्वितीय श्रेणीचे डबे अनारक्षित प्रवाशांसाठी ठेवले आहेत. अमृत भारत एक्सप्रेस मध्ये 1800 प्रवाशांची आसनक्षमता आहे. ट्रेनला दोन्ही बाजूस इंजिन्स बसवलेले आहे. या ट्रेनमध्ये आधुनिक सुविधा असून प्रवाशांच्या सोयीकरीता CCTV कॅमेरे, FRP मोड्युलर टॉयलेट्स, सेन्सर पाण्याचे नळ आणि उद्घोषणा यंत्रणा उपलब्ध केली गेली आहे. वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनच्या तुलनेत अमृत भारत एक्सप्रेस ट्रेनचे प्रवासी भाडे कमी आहे. सर्वसामान्य, गरिबांना परवडणारी ही ट्रेन आहे. वंदे भारत एक्सप्रेसनंतर 4 वर्षानी तशीच, सुविधायुक्त, गरिबांना परवडणारी अमृत भारत एक्सप्रेस ट्रेन केंद्र सरकार सुरु करीत आहे.
स्थलांतरीत कामगारांसाठी या ट्रेनची डिझाईन केली आहे. लोको-होल्ड कॉन्फिगरेशन, पुश-पुल सेटअप अशी सुविधा आहे. ट्रेनच्या प्रत्येक टोकाला WAP5 लोकोमोटिव्ह आहे. या ट्रेनची निर्मिती चेन्नई येथील इंटिग्रल कोच फॅक्टरी (ICF) यांनी केली आहे. या ट्रेनची चाचणी 4- 5 महिने घेण्यात येणार असून त्यानुसार पुढील बदल करण्यात येणार आहेत. सध्याच्या एक्स्प्रेस गाड्यांपेक्षा बेस भाडे 15% जास्त ठेवण्याची भारतीय रेल्वेची योजना आहे.
अमृत भारत पारंपारीक मार्गांवर सुरु राहणार असून भारतीय रेल्वे पायाभूत सुविधांमध्ये ही ट्रेन म्हणजे मैलाचा दगड ठरणार आहे.
वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनची वैशिष्ट्ये –
वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनमधून प्रवासी मध्यम-अंतराचा आलिशान, लक्झरी प्रवास करू शकतात. विविध स्तरांवर मिळणाऱ्या महसुलामुळे भारताच्या रेल्वे पायाभूत सुविधांमध्ये या ट्रेनचे योगदान मोठे आहे. भारतीय रेल्वेने प्रवाश्यांना सर्व सोयींनी युक्त आरामशीर प्रवास करण्यासाठी अत्याधुनिक सेवा देत ही ट्रेन सुरु केली आहे. ट्रेनमध्ये 16 AC एक्झिक्युटिव्ह क्लास (EC) आणि चेअर कार (CC) कोच अशी उच्च दर्जाची सुविधा दिली आहे. वंदे भारत ट्रेनची वेगाची क्षमता 160 किमी प्रति तास आहे, परंतु ती 130 प्रति तास धावते. ही ट्रेन पूर्णत: इलेक्ट्रिकल असून इंजिन पॉवर 6000 हॉर्स पॉवर इतकं आहे.
केंद्र सरकारने प्रवाश्यांना अतिशय चांगली सुविधा देण्याच्या दृष्टीने वंदे भारत एक्सप्रेस रेल्वे दि. 15 फेब्रुवारी 2019 रोजी सुरू केली. या ट्रेनला हाय पॉवर सिस्टम पुरवली गेली आहे, त्यावरच ट्रेनचे कार्य चालते. या ट्रेनमधील प्रवाश्यांची GPS-आधारित माहिती घेतली जाते. GPS-आधारित माहिती प्रणाली हे या ट्रेनचे वैशिष्ट्य आहे. या ट्रेनमध्ये बायो वॅक्युम toilets ची सुविधा देण्यात आली आहे. तसेच ही ट्रेन 10 तासांपेक्षा कमी वेळेत शहरांना जोडते. तामिळनाडू राज्यातील चेन्नईतील इंटिग्रल कोच फॅक्टरी (ICF) यांनी वंदे भारत ट्रेनची निर्मिती केली आहे. या ट्रेनमध्ये इकॉनॉमी आणि प्रीमियम क्लासेसमधील प्रौढ व्यक्तींसाठी सरासरी भाडे आकारण्यात आले आहे. ऑगस्ट 2024 पर्यंत देशात 75 वंदे भारत एक्सप्रेस चालवण्याचे सरकारचे लक्ष्य आहे.