हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । खलिस्तान समर्थक आणि वारीस पंजाब दीचा प्रमुख असलेला अमृतपाल सिंग याला मोगा पोलिसांनी अटक केली आहे. त्याने स्वतःच हे आत्मसमर्पण केलं आहे. तब्बल ३६ दिवसांनंतर अमृतपाल पोलिसांच्या हाती लागला आहे. अजनाळा घटनेनंतर अमृतपाल फरार झाला होता.
अमृतपाल सिंह हा 18 मार्चपासून फरार होता जेव्हा त्याच्यावर आणि त्याच्या साथीदारांवर पोलिस कारवाई सुरू झाली होती. त्यानंतर पंजाब पोलिसांसह देशातील वेगवेगळ्या राज्यातील पोलिसांकडून त्याचा शोध सुरु होता. पण त्यांना यश मिळत नव्हते. पंजाब पोलिसांच्या 80,000 कर्मचार्यांव्यतिरिक्त, सर्व राजपत्रित अधिकारी, काउंटर इंटेलिजन्स आणि गुप्तचर संस्थेचे अधिकारी अमृतपालला शोधण्यात सपशेल अपयशी ठरले. अखेर आज त्याने स्वतःच आत्मसमर्पण केल्यानंतर मोगा येथील गुरुद्वारातून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे. अमृतपाल सिंगला आसाममधील दिब्रुगड तुरुंगात पाठवण्यात येणार आहे. पंजाब पोलिसांनी यापूर्वीच खलिस्तान समर्थकांविरोधात कठोर राष्ट्रीय सुरक्षा कायदा (NSA) लागू केला आहे.
Live: 'Waris Punjab De' chief Amritpal Singh arrested from Moga
Read @ANI Story | https://t.co/apnEcNmoXc#PunjabPolice #Punjab #Moga #AmritpalSingh #warispunjabde pic.twitter.com/u42kBtGTce
— ANI Digital (@ani_digital) April 23, 2023
अमृतपालने नेमकं काय केलं होते ?
रुपनगर जिल्ह्यातील चमकौर साहिब येथील वरिंदर सिंग यांनी लवप्रीत सिंग आणि अमृतपाल यांच्यासह त्यांच्या ३० समर्थकांवर अपहरण आणि प्राणघातक हल्ला केल्याची तक्रार दाखल केली होती, त्यानंतर लवप्रीत आणि अन्य आरोपींना अटक करण्यात आली होती. यानंतर अमृतपालने लवप्रीतला सोडवण्यासाठी पोलिस स्टेशनबाहेर धरणे आंदोलनाचा इशारा दिला. 23 फेब्रुवारी रोजी अमृतपाल आपल्या समर्थकांसह श्री गुरु ग्रंथ साहिब जीचे पवित्र रूप घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचले. पोलिसांनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला असता, संतप्त जमावाने बॅरिकेड्स तोडून पोलिस ठाण्यावर तलवारी आणि बंदुकींनी हल्ला केला, या घटनेपासूनच तो पोलिसांच्या निशाण्यावर होता.