हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | ग्रामीण भागात बैलगाडा शर्यती मोठ्या प्रमाणात आयोजित केल्या जात आहेत. मात्र, काही ठिकाणी शर्यतीवेळी अनेक दुर्घटना घडत आहेत. अशीच एक दुर्घटना सातारा तालुक्यातील नागठाणे येथे घडली आहे. या ठिकाणी बैलगाडा शर्यतीत बैलगाडीच्या धडकेत एकाचा मृत्यू झाला. बिरेंदर सिंग (मूळ रा. पंजाब राज्य, सध्या. रा. बोरगाव, ता. सातारा) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सातारा तालुक्यातील नागठाणे येथे भव्य बैलगाडा शर्यती आयोजित करण्यात आल्या होत्या. या शर्यती स्पर्धेत राज्यभरातून सुमारे २५० हून अधिक बैलगाड्या सहभागी झाल्या होत्या. सेमीफायनलची चौथी फेरी सुरू असताना सीमारेषेसमोरच बेशिस्तपणे उभ्या असणाऱ्या शौकिनांपैकी बिरेंदर सिंग यांना वेगात आलेल्या बैलगाडीने जोरची धडक दिली. या धडकेत बिरेंदर सिंग गंभीर जखमी झाले.
स्पर्धेच्या आयोजकांनी शर्यतस्थळी असलेल्या रुग्णवाहिकेतून तत्काळ नागठाण्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात बिरेंदर सिंग यांना हलवले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांचा मृत्यू झाला असल्याचे सांगितले. या घटनेची नोंद बोरगाव पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. अधिक तपास हवालदार हणमंत सावंत करत आहेत.