हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| नाशिकमधील ड्रग्ज प्रकरणाचा मुद्दा राज्यभरात चर्चेत आला आहे. या प्रकरणावरून आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी गंभीर आरोप केले आहेत. माध्यमांशी बोलताना, “ड्रग्ज प्रकरणी कुणाला किती हप्ता जातो याचा कागदच पोलिस सूत्रांनी मला दिला आहे. एका आमदाराला महिन्याला 16 लाखांचा हप्ता मिळतो हे पाहून मलाच धक्का बसला. अमली पदार्थांच्या व्यापारातून सहा आमदारांना हप्ते जात होते.” असा गौप्यस्फोट संजय राऊत यांनी केला आहे.
देवेंद्र फडणवीस भांग पीत नसतील पण..
त्याचबरोबर, ड्रग्ज प्रकरणावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत राऊतांनी म्हणले आहे की, “गृहमंत्री देवेंद्र फडणवीस भरकटलेले आहेत. ते भांग पीत नसतील, पण त्या वासाने त्यांना नशा येत असेल. अशी जी माणसं आहेत, जी नशेच्या बाजारात फिरत आहेत. या नशेबाजांमुळे त्यांची मती गुंग झाली आहे. तसेच, “ड्रग्ज तस्कर ललित पाटील याचा मित्रपरिवार विधानसभेपर्यंत आहे. या रॅकेटमध्ये आमदार, मंत्री आणि पोलिस देखील आहेत” असा आरोपही राऊतांनी केला आहे.
पोलिसांसह आमदार हप्ते घेत..
इतकेच नव्हे तर, “संशयित ललित पाटील हा ड्रग्ज प्रकरणातील हिमनगाचे टोक आहे. ड्रग्ज रॅकेट आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत आहे. रॅकेट चालविण्यासाठी पोलिसांसह आमदार हप्ते घेत होते. ललित पाटील व मित्र परिवाराचे संबंध विधानसभेपर्यंत आहे. या रॅकेटमध्ये आमदार सहभागी आहेत. मंत्री व पोलिसांवरदेखील आरोप आहेत. ज्यांना या प्रकरणात पकडले गेले ते फक्त मोहरे आहेत” असे राऊतांकडून सांगण्यात आले आहे.
दरम्यान, नाशिकच्या ड्रग्ज प्रकरणात पोलिसांच्या हाती नवंनवे धागेदोरे लागत आहेत. आता याप्रकरणी नाशिक पोलीस सराफ व्यावसायिकाची चौकशी करणार आहेत. कारण, ड्रग्जच्या पैशातून ललित पाटीलच्या भावाने नाशिकमधून सोने खरीदी केले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. त्यामुळे आता पोलीस नाशिकच्या सराफ व्यावसायिकाची कसून चौकशी करणार आहेत. या चौकशीतून त्यांच्या हाती मोठी माहिती लागेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.