औरंगाबाद – तब्बल दोन दशकानंतर औरंगाबादेत रेल्वेचा प्रलंबित प्रश्नांनावर आज बैठक झाली. या बैठकीत मराठवाड्याने मागणी केलेल्या नव्या रेल्वे लाईनवर सर्वेक्षणात फायदा मिळणार नसल्याचे रेल्वेच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्याने सांगताच औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील रेल्वे प्रश्नांवरील बैठकीत चांगलेच भडकले. आधीच मागास भाग त्यात नवीन रेल्वे येणार नसल्यास या भागाचा विकास कसा होईल, असा संतापजनक सवाल खा. जलील यांनी उपस्थित केला. वातावरण चांगलेच तापत असल्याने केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी मध्यस्थी करत वातावरण शांत केले.
मराठवाड्यातील खासदारांची आज औरंगाबादेत जिल्हाधिकारी कार्यालयात रेल्वेच्या प्रश्नांवर महत्त्वपूर्ण बैठक झाली. अंदाजे दोन दशकांनंतर रेल्वेची बैठक औरंगाबादेत होत असल्याने मराठवाड्यातील रेल्वे प्रवासी, संघटनांचे बैठकीकडे लक्ष होते. बैठकीत केंद्रीय रेल्वेराज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड, खा. इम्तियाज जलील, फौजिया खानआदींची उपस्थिती होती. यावेळी मराठवाड्यातील रेल्वेचे विद्युतीकरण आणि नवीन रेल्वे सुरु करण्यात याव्यात ही मागणी पुढे आली. यावर बैठकीतील मध्य रेल्वेच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी, सर्वेक्षणात या मार्गावर फायदा नसल्याचे सांगितले.
यामुळे खा. इम्तियाज जलील चांगलेच भडकले. मराठवाडा आधीच मागास असल्याने त्याची तुलना इतरांशी होऊ शकत नाही. आधीच भागास त्यात विद्युतीकरण, नवीन रेल्वे नसल्यास या भागाचा विकास कसा होईल असा संतप्त सवाल खा. जलील यांनी उपस्थित केला. बैठकीत वातावरण चांगलेच तापत असल्याने केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी मध्यस्थी केली. दानवे यांनी, तुमच्या सर्व मागण्या मान्य आहेत असे आश्वासन खा. जलील यांना देत वातावरण शांत केले. तसेच यावेळी खा. जलील यांनी मराठवाड्याचे रेल्वे प्रश्न निकाली काढण्यासाठी कोकण रेल्वेच्या धर्तीवर मराठवाडा रेल्वे डेव्हलपमेंट काॅर्पोरेशनची स्थापना करावी अशीही मागणी केली.