हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईतील वांद्रे-वरळी सी लिंकला सुसाईड पॉईंट म्हणून संबोधण्यात येते. कारण की, या ठिकाणी अनेकजणांनी सुसाईड करण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच सी लिंकवर होणाऱ्या अपघाताचे प्रमाण देखील जास्त आहे. त्यामुळे वरळी सी लिंक नेहमीच धोक्याची मानली जाते. आता पुन्हा एकदा याच ठिकाणी एका अज्ञात व्यक्तीने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. सध्या हेलिकॉप्टरच्या मदतीने या व्यक्तीला शोधण्याचा प्रयत्न पोलिसांकडून सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळच्या दरम्यान एका व्यक्तीने वरळी सी लिंक पुलावरून जाताना आपली कार बाजूला थांबवली. यानंतर थोड्याच वेळात त्याने समुद्रात उडी मारली. येणाऱ्या जाणाऱ्यांच्या लक्षात ही बाब आल्यानंतर त्यांनी त्वरित पोलिसांना घटनास्थळी बोलवून घेतले. सध्या पोलीस कोस्ट गार्डसोबत समुद्रात उडी मारलेल्या या व्यक्तीला शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. तसेच त्याच्या कारवरून इतर वैयक्तिक माहितीचा शोधही पोलिसांकडून सुरू आहे. मुंबई पोलिसांकडून या व्यक्तीला शोधण्यासाठी एक हेलिकॉप्टर देखील बोलवण्यात आले आहे. हेलिकॉप्टरच्या मदतीने पोलिसांनी आता शोध मोहीम सुरू केली आहे. या सर्व घटनेची क्लिप वरळी सी लिंकवर लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
दरम्यान, या घटनेमुळे वरळी सी लिंकवरून आत्महत्या करण्याचे प्रमाण वाढताना दिसत आहे. बॉम्बे हायकोर्टात देखील या संबंधित याचिका दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणी झालेल्या सुनावणीत बॉम्बे हायकोर्टाने राज्य सरकारकडे सतत घडणाऱ्या आत्महत्या आणि अपघातांच्या घटनांचे उत्तर मागितले होते. तसेच सी लिंक वरील सुरक्षा वाढवण्यात यावी. तसेच सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची संख्या देखील वाढवली जावी असे आदेश बॉम्बे हायकोर्टाने सरकारला दिले होते. मात्र यानंतर देखील कोणतीही त्वरित कारवाई न करता या सर्व घटनांकडे दुर्लक्ष करण्याचे काम सरकारने केले. आता पुन्हा सीलिंकवर आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे.