जत : हॅलो महाराष्ट्र – सांगलीमधील जत या ठिकाणी एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका महिलेने रागाच्या भरात आपल्या 2 चिमुकल्यासह विहिरीत उडी घेऊन आत्महत्येच्या प्रयत्न केला. यामध्ये 2 चिमुकल्याचा मृत्यू झाला असून महिला मात्र बचावली आहे. बुधवारी सकाळी 10 च्या सुमारास खैराव या ठिकाणी हि धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने लोणार परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. हि आत्महत्या नेमकी कशामुळे केली हे अजून समजू शकले नाही .
काय आहे प्रकार
मृत मुलांची नावे सुप्रिया शंकर बुरुंगले आणि समर्थ शंकर बुरुंगले असे आहे. तर रूपाली शंकर बुरुंगले असे बचावलेल्या महिलेचे नाव आहे. रूपालीचे लोणार येथील शंकर बुरुंगले यांच्याशी 4 वर्षापूर्वी विवाह झाला होता. त्यांना एक मुलगा व मुलगी अशी दोन लहान मुले होती. तसेच आज सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास रूपालीने खैराव हद्दीतील स्वतःच्या विहिरीत दोन्ही मुलाना टाकले. व त्यानंतर स्वतः विहिरीत उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला आहे.
यामध्ये मात्र त्या चिमुरड्यांचा दुर्दैवी अंत झाला. रूपालीने मोटर सोबत असलेल्या रस्सीला पकडल्यामुळे तिचा जीव वाचला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक गोपाळ भोसले यांनी घटनास्थळी धाव घेऊन पुढील गोष्टीचा तपास सुरु केला आहे.