औरंगाबाद – आजकाल लहान मुले रंगाच्या भारत काय करतील काही सांगता येत नाही. अशातच आई रागावल्याचा राग मनात धरुन घर सोडून निघून गेलेल्या १२ वर्षीय मुलाचा मुकूंदवाडी पोलिसांनी अवघ्या दोन तासात शोध घेऊन आईवडिलांच्या हवाली केले. विशेष म्हणजे मुकूंदवाडी पोलिसांकडे पालकांची तक्रार प्राप्त होताच पोलिसांचे एक पथक तत्काळ कामास लागले. अन् तांत्रिक पद्धतीने शोध घेत सीसीटीव्हीच्या मदतीने संबंधित मुलास राजनगर रेल्वेपटरी परिसरातून निघून गेलेल्या मुलास ताब्यात घेऊन कुटुंबीयांकडे सुपूर्द केले. ही घटना काळ उघडकीस आली आहे.
या प्रकरणी शोध पथकप्रमुख तथा उपनिरीक्षक अमोल टी. म्हस्के यांनी दिलेल्या माहितीनुसार मुकूंदवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील विठ्ठलनगर, प्रकाशनगर परिसरात सूर्यकांत जैस्वाल (नाव बदललेले आहे) राहतात. त्यांचा १२ वर्षीय मुलगा तेजस्वीकुमार (नाव बदललेले आहे) याला त्याची आई काही कारणावरून रागावली होती. याचा राग मनात धरुन तेजस्वीकुमारने रविवारी (ता.२९) सकाळी नऊ वाजेदरम्यान कोणालाही काही कळू न देता घर सोडले. ही बाब कुटुंबीयांच्या लक्षात येताच त्याचा सकाळी नऊ वाजेपासून सायंकाळी पाच वाजेपर्यंत कुटुंबीय शोध घेत होते.
मित्र, नातेवाईक यांच्याकडे शोध घेऊनही न सापडल्याने आईवडिलांनी अखेर पोलिसांकडे धाव घेतली. तक्रार येताच वरिष्ठ पोलिस निरीक्षक मनोज पगारे, निरीक्षक ब्रह्मा गिरी यांनी उपनिरीक्षक म्हस्के यांच्यासह कर्मचाऱ्यांना शोध घेण्याच्या सूचना करताच पथकप्रमुख म्हस्के तातडीने कामाला लागले. सेफ सिटी कॅमेऱ्याच्या माध्यमातून माग काढत म्हस्के यांनी अवघ्या तासात म्हणजे सात वाजता तेजस्वीकुमारचा शोध घेतला. त्याला आईवडिलांच्या हवाली करण्यात आले. ही कारवाई उपनिरीक्षक म्हस्के यांच्यासह उपनिरीक्षक सुनील चव्हाण, उपनिरीक्षक संदीप वाघ, अंमलदार नरसिंग पवार, बाबासाहेब कांबळे, मनोहर गिते, संतोष भानुसे, सुधाकर पाटील, श्याम आढे, विनोद बनकर, गणेश वाघ यांनी केली. पुढील तपास उपनिरीक्षक वाघ करत आहेत.