Tuesday, March 21, 2023

उद्या दिसणार ‘कंकणाकृती सूर्यग्रहण’; ग्रहण पाहताना अशी घ्या काळजी

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र टीम । या वर्षीचे शेवटचे सूर्यग्रहण उद्या 26 डिसेंबर रोजी सकाळी 8 ते 11 च्या दरम्यान दिसणार आहे. हे सूर्यग्रहण कंकणाकृती स्वरूपाचे सूर्यग्रहण असेल. सूर्य आणि पृथ्वी यांच्यामध्ये चंद्र आल्याने हे ग्रहण निर्माण होते. सूर्याचा मधला भाग चंद्र मध्ये आल्याने झाकला जातो, त्यामुळे चंद्राची कडा प्रकाशमान दिसते, तेजस्वी बांगडीसारखा आकृती निर्माण होते आणि कंकणाकृती सूर्यग्रहण दिसते.

कर्नाटक,केरळ आणि तमिळनाडू या राज्यांत हे सूर्यग्रहण कंकणाकृती स्वरूपात दिसेल तर हा भाग वगळता देशाच्या इतर भागात हे ग्रहण खंडग्रास अवस्थेत दिसेल. जगाच्या विविध भागांमध्ये हे ग्रहण दिसणार असून सूर्यग्रहणाची कंकणाकृती अवस्था सर्वप्रथम सौदी अरेबियाच्या पूर्व भागात पहायला मिळेल.

- Advertisement -

सूर्यग्रहण पाहताना अशी घ्या काळजी

सूर्याकडून येणाऱ्या प्रखर आणि अतिनील किरणांमुळे डोळ्यांना कायमस्वरूपी इजा पोहोचू शकते. त्यामुळे सूर्याशी संबंधित आकाशात घडणारी घटना उघड्या डोळ्यांनी कधीच पाहू नये. सूर्यग्रहण पाहण्यासाठी सोलर फिल्टर्स असलेले चष्मे वापरावे किंवा प्रोजेक्शन पद्धत वापरून सूर्यग्रहण पहावे. बाजारात मिळणारे सोलार गॉगल सूर्यग्रहण पाहण्यासाठी सर्वात सुरक्षित मानले जातात. बाजारात कमी दर्जाचे फेक गॉगलही आहेत अशा गॉगलमुळे डोळ्यांना इजा पोहोचू शकते.