नवी दिल्ली । रिलायन्स समूहाचे अध्यक्ष अनिल अंबानी यांना लंडनमधील न्यायालयाने मोठा झटका दिला आहे. न्यायालयाने त्यांना येत्या २१ दिवसांत तीन चिनी बँकांना ७१७ मिलियन डॉलर्स (५००० कोटी) चुकते करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे अगोदरच आर्थिक तंगीचा सामना करत असलेल्या अनिल अंबानी यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. प्राथमिक माहितीनुसार, रिलायन्स कम्युनिकेशन लिमिटेडने २०१२ साली कर्ज घेतले होते. या व्यवहारासाठी अनिल अंबानी यांनी वैयक्तिक हमी दिली होती. त्यामुळे न्यायालयाने अनिल अंबानी यांच्याकडून पैसे वसूल करण्याचे आदेश दिल्याचे समजते.
मात्र, अनिल अंबानी यांच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, अनिल अंबानी यांनी कधीही या कर्जासाठी वैयक्तिक हमी दिली नव्हती. त्यामुळे हे अनिल अंबानी यांचे वैयक्तिक कर्ज नाही. अनिल अंबानी यांनी अशा कोणताच कागदपत्रांवर स्वाक्षरी केली नव्हती. त्यामुळे आता अनिल अंबानी या सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी कायदेशीर सल्ला घेत आहेत. लंडनमधील न्यायालयाच्या आदेशानुसार अंबानी यांना चीनच्या इंडस्ट्रीयल अँड कमर्शियल बँक, चायना डेव्हलपमेंट आणि एक्झिम बँक ऑफ चायना यांना पैसे द्यावे लागणार आहेत.
काही दिवसांपूर्वीच अनिल अंबानी यांनी आपल्या डोक्यावरील कर्जाचा बोजा कमी करण्यासाठी बीएसईएस आणि यमुना डिस्कॉम या दोन वीज कंपन्यांमधील मोठा हिस्सा विकण्याचा निर्णय घेतला होता. या दोन्ही कंपन्यांचे मिळून सध्या ४४ लाख ग्राहक आहेत. यापूर्वीही त्यांनी आपल्या वीज वितरण कंपनीची विक्री केली होती. त्यांनी आपली रिलायन्स एनर्जी ही कंपनी अदानी समुहाच्या अदानी ट्रान्समिशन लिमिटेडला विकली होती. यानंतर आता अनिल अंबानी वीज कंपन्यांमधील ५१ टक्के हिस्सा विकणार असल्याचे कळते. हा हिस्सा विकत घेण्यासाठी ब्रुकफिल्ड एसेट मॅनेजमेंट, ग्रिनको एनर्जी, टोरंट पावर या कंपन्यांसह ८ कंपन्यांनी रस दाखवल्याचे समजते.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”