नवी दिल्ली । चिनी बँकांकडून घेतलेल्या कर्जाचे हप्ते थकवल्याप्रकरणी सध्या लंडन येथील न्यायालयात उद्योगपती अनिल अंबानी (Anil Ambani )यांच्यावर खटला सुरु आहे. या खटल्याच्या सुनावणीदरम्यान आपण एक साधारण आयुष्य जगत असल्याचं म्हटलं आहे. तसंच आपल्याकडे असलेले दागिने विकून आपण आपल्या वकिलांची फी भरत असल्याचंही त्यांनी न्यायालयाला सांगितलं आहे. यावरून आता ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांनी निशाणा साधला आहे. “अनिल अंबानी यांनी युकेमधील न्यायालयात, वकिलांची फी भरण्यासाठी पत्नीचे दागिने विकले असून आता आपल्याकडे काहीही नाही, केवळ एक छोटी कार आहे अशी माहिती दिली. ही तीच व्यक्ती आहे ज्यांना मोदींनी ३० हजार कोटींचं राफेलचं ऑफसेट कंत्राट दिलं”.असं प्रशांत भूषण यांनी ट्विट केलं आहे.
Anil Ambani told a UK Court that he sold his wife's jewellery to pay his legal fees and owns nothing, just one small car! This is the guy to whom Modi gave the Rafale offset contract worth 30,000 crores! pic.twitter.com/J9B3D7dawF
— Prashant Bhushan (@pbhushan1) September 26, 2020
चिनी बँकांनी कर्जाच्या वसुलीसाठी अनिल अंबानी यांची मालमत्ता जप्त करण्याची लंडनच्या न्यायालयात परवानगी मागितली आहे. चिनी बँकांनी अनिल अंबानी यांच्याकडे जवळपास ५ हजार २८१ कोटी रूपये थकीत कर्जाच्या पैशासाठी तगादा लावला आहे. अनिल अंबानी यांच्याकडे अनेक महागड्या गाड्या असल्याचे या बँकाचे म्हणणे आहे. यासंदर्भात शुक्रवारी झालेल्या सुनावणीत अनिल अंबानी यांना विचारणा करण्यात आली. त्यावेळी अनिल अंबानी यांनी आपण सध्याच्या घडीला अत्यंत साधे जीवन जगत असल्याचे सांगितले. मी धूम्रपान आणि मद्यसेवनही सोडले आहे. मी अलिशान जीवन जगत असल्याच्या गोष्टी ही प्रसारमाध्यमांची निर्मिती आहे.
वकिलांची फी आणि इतर कायदेशीर खर्चासाठी जानेवारी ते जून या कालावधीत घरातील सर्व दागिने विकावे लागले. दागिन्यांच्या विक्रीतून आपल्याला ९.९ कोटी रुपये मिळाले होते. यानंतर आता माझ्याकडे देण्यासारखे फारसे काही उरलेले नाही. तसेच माझ्याकडे अलिशान गाड्यांचा ताफा असल्याची प्रसारमाध्यमांतील वृत्ते ही अतिरंजित आहेत. माझ्याकडे कधीच रोल्स रॉईस कार नव्हती. सध्या माझ्याकडे केवळ एकच कार उरली आहे. तसेच रोजच्या खर्चासाठीही मी मुलाकडून कर्ज घेतल्याचा खुलासा अनिल अंबानी यांनी केला.
२२ मे २०२० रोजी यूके उच्च न्यायालयानं अनिल अंबानींना १२ जून २०२० पर्यंत चीनच्या तीन बँकांचे ७१,६९,१७,६८१ डॉलर्स (जवळपास ५ हजार २८१ कोटी रूपये) कर्जाची रक्कम आणि ५० हजार पौंड्स ( जवळपास ७ कोटी रूपये) कायदेशीर प्रक्रियेच्या खर्चाच्या रकमेपोटी भरण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर १५ जून रोजी इंडस्ट्रिअल अँड कमर्शिअल बँक ऑफ चायनाच्या नेतृत्वाखाली चिनी बँकांनी अनिल अंबानी यांच्या संपत्तीची माहिती देण्याची मागणी केली.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.