हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेचं सरकार एकत्रितपणे काम करत असताना या युतीत पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे. राष्ट्रामध्ये मोदी, महाराष्ट्रात शिंदे अशी जाहिरात सर्व वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाल्यानंतर ही गोष्ट भाजपच्या चांगलीच जिव्हारी लागली आहे. याच पार्श्वभूमीवर आज भाजप खासदार अनिल बोंडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर विखारी टीका केली आहे. बेडूक किती फुगला तरी हत्ती बनत नाही असं म्हणत बोंडे यांनी शिंदेंवर जोरदार निशाणा साधला आहे. विशेष म्हणजे राज्यात शिंदे- फडणवीसांचे सरकार आल्यानंतर प्रथमच भाजपकडून एकनाथ शिंदेंवर टीका करण्यात आली आहे.
प्रसारमाध्यमांशी बोलताना अनिल बोंडे म्हणाले, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत, भाजपनेही त्यांना स्वीकारलं आहे पण त्यांचे सल्लागार त्यांना चुकीचे सल्ले देत असतील. बेडूक कितीही फुगला तरी हत्ती बनत नाही. ठाणे म्हणजे पूर्ण महाराष्ट्र नाही, ज्याप्रमाणे उद्धव ठाकरे यांना मुंबई म्हणजेच संपूर्ण महाराष्ट्र वाटायचा. तसेच, एकनाथ शिंदेंना आता ठाणे म्हणजे संपूर्ण महाराष्ट्र वाटत आहे. पण ठाणे म्हणजे संपूर्ण महाराष्ट्र नाही.खरं तर देवेंद्र फडणवीस हे आज बहुजनांचे खरे नेते आहेत, मग ओबीसी आरक्षण असो वा मराठा आरक्षण, धनगर समाजाची भलाई असो वा आदिवासी समाजाचे कल्याण असो, दिव्यांगांचे काम असो या सर्व गोष्टींना न्याय देण्याचं काम देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे . महाराष्ट्र्रातील प्रत्येक खेड्यापाड्यात देवेंद्र फडणवीस यांचेच नाव घेतलं जाते असं अनिल बोंडे यांनी म्हंटल.
संयम पाळा – शंभूराज देसाई
दरम्यान, अनिल बोंडे यांच्या या टीकेनंतर शिंदे गटाचे आमदार आणि मंत्री शंभूराज देसाई यांनीही त्यांना जोरदार पलटवार केला आहे. कालची जाहिरात हि शिवसेनेची अधिकृत जाहिरात नव्हती. तर हितचिंतकाने ही जाहिरात दिलेली होती. याबाबत आम्ही स्पष्टीकरण दिलेले आहे. यानंतर आम्ही समजूतदारपणाची भूमिका घेऊनही अनिल बोंडे यांनी मुख्यमंत्र्यांवर अशा शब्दांत टीका करणे योग्य नाही. आम्ही संयम पाळला आहे. त्यांच्याकडून देखील संयम पाळण्याची अपेक्षा आहे. दोन्ही बाजूनी सामंजस्याची भूमिका घेतली पाहिजे असं शंभूराज देसाई यांनी म्हंटल.